मोर्शी तालुक्यातील बोडणा येथील नागरिकांचे आमरण उपोषण सुरू
उपोषणाचा आज दुसरा दिवस
मोर्शी / प्रतिनिधी
मोर्शी तालुक्यातील बोडणा खोपडा या गावातील शेतकऱ्यांची शेती तसेच त्यांची घरे शासनाने निम्नचारगड प्रकल्पाकरिता संपादित केली होती. त्याबाबतचा निवडा आधी दिनांक २६/९/२०१२ रोजी पारित झाला असून दोन्ही गावातील घरे व जमीन एकाच प्रकल्पासाठी म्हणजे निम्न चारगड धरणा करिता झाल्यानंतरही दोन्ही गावाचे निवाडे पारित करताना बोडणा येथील शेतकऱ्यांच्या गावाचा निवाडा जुन्या कायद्याप्रमाणे करण्यात आला तसेच मौजा खोपडा येथील निवाडा कलम १३ नवीन कायद्यानुसार करण्यात आला तसेच बोडणा गावाचे पुनर्मूल्यांकन करून तेथील गावकऱ्यांना कलम १३ नुसार नवीन कायद्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा व एक धरण एक न्याय देण्यात यावा. बोडना गावाला भूसंपादनाची रक्कम खूप कमी रुपये म्हणजे १३०/-प्रति चौरस मीटर देण्यात आली तसेच मौजा खोपडा गावाला रुपये ५००/-प्रति चौरस मीटर देण्यात आली तसेच त्यावेळेस बोडना गावाकरिता मंजूर झालेले पुनर्वसन मौजे बोडना येथे होते. परंतु त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची नागरी सुख सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बोडणा येथील नागरिकांनी त्या जागेचा ताबा घेतला नाही. तसेच नुकतेच शासनाने दिलेली पुनर्वसित जागा ही बुडीत क्षेत्रात असून. या बाबतीत शासनाने एवढ्या वर्षानंतर आता शासनाने तेथील नागरिकांना याबाबतीत माहिती दिली. या सर्व बाबीमुळे तेथील नागरिक त्या पुनर्वसीत जागेत स्थलांतरित झाले नाही. तसेच त्यांनी विनंती केली की मौजे येरला तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथील रोडला लागून असलेली जागा पुनर्वसन करिता देण्यात यावी. तसेच त्या पुनर्वसन जागेत नवीन भूसंपादन व पुनर्वसन कायद्यानुसार सर्व १८ नागरि सुख सुविधा देण्यात याव्या त्याचबरोबर तेथील बरेचसे लोक भूमीहीन होत असल्यामुळे तेथील नागरिकांच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्याला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे शासकीय सेवेत समावेश करून घ्यावेत तसेच प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्यात यावा. प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना घरकुल देण्यात यावे, तसेच पुनर्वसनाच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याकरिता शासन नियमाप्रमाणे मोबदला व सर्व लाभ देण्यात यावे, मौजा बोडणा येथील सन २०१२ मध्ये जाहीर झालेला निवाडा चुकीचा असून त्यात बोडणा या गावातील बरेचसे धार्मिक स्थळ मूल्यांकन करताना त्या जागेचे मूल्यांकन विचारात न घेता निवाडा पारित करण्यात आला. माता मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची जागा, सिताराम मंदिर तसेच गावातील अंदाजे ३० ते ४० लोकांचे कुटुंब जे बऱ्याच वर्षापासून गावांमध्ये राहत आहेत त्यांचे सुद्धा घर निवाडा करताना विचारात घेतले नाही. तसेच बऱ्याच लोकांची नावे निवाडा करताना चुकीचे वागल्यामुळे निवड्याची रक्कम सुद्धा आजपर्यंत त्यांना मिळालेली नाही. त्याचबरोबर शासन नियमाप्रमाणे ज्या लोकांच्या घराचे मूल्यांकन १,६५,०००/-रुपये पेक्षा कमी असेल तर त्या घराला मोबदला किमान १,६५,०००/-रुपये देण्यात यावा हे शासन निर्णय असतानाही काही घरांना रुपये ४०,०००/-व रुपये ५०,०००/-फक्त इतका मोबदला दिला आहे. ही बाब सुद्धा विचारात घेण्यात यावी. या सर्व मागण्या मान्य न झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय मोर्शी येथे बोडणा येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.