अजब गजब

एक असा तलाव जेथे दगड चालतात ? 

Spread the love

कॅलिफोर्निया / नवप्रहार ब्युरो 

               दगड चालतात असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये एक अनोखा आणि गूढ निसर्गचमत्कार पाहायला मिळतो. येथे असलेल्या ‘रॅस्ट्रॅक प्लाया’ या विस्तीर्ण, सपाट आणि कोरड्या तलावात काही दगड स्वतःहून जमिनीवर सरकतात, आणि त्यांच्या मागे लांबच लांब रेघा उमटतात.

जणू काही हे दगड ‘चालत’ पुढे जातात! या अद्भुत प्रकाराने शास्त्रज्ञ आणि पर्यटक दोघेही अनेक वर्षांपासून आश्चर्यचकित झाले. त्यामागचे कारण आहे तरी काय?

या दगडांना ‘स्लाइडिंग स्टोन्स’ किंवा ‘सेलिंग स्टोन्स’ असे म्हटले जाते. काही दगडांचे वजन 30 किलोपेक्षा जास्त असते, तरीही ते जमिनीवरून आपोआप सरकतात. अनेक दशकांपासून या घटनेमागचे कारण गूढ होते. काहींनी वादळ, प्रचंड वारा किंवा अगदी गूढ शक्तींचाही अंदाज वर्तवला होता. 2014 मध्ये शास्त्रज्ञांच्या एका पथकाने या घटनेचा अभ्यास केला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रहस्य उलगडले.

कडाक्याची थंडी असलेल्या हिवाळ्यात, पाण्याचा पातळ थर आणि त्यावर तयार होणार्‍या बर्फाच्या पातळ पट्टीमुळे हे दगड सरकतात असे दिसून आले. सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर बर्फ वितळू लागतो आणि वार्‍याच्या झोतामुळे दगड हळूहळू सरकतात. या हालचालीमुळे दगडांच्या मागे लांब रेघा तयार होतात. रॅस्ट्रॅक प्लायामधील हे सरकणारे दगड पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरले आहेत.

अनेक निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि शास्त्रज्ञ येथे भेट देतात. मात्र, या नाजूक परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी पार्क प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. डेथ व्हॅलीतील सरकणारे दगड हे निसर्गातील एक अद्वितीय आणि विस्मयकारक उदाहरण आहे. विज्ञानाने या गूढ घटनेचे स्पष्टीकरण दिले असले, तरी प्रत्यक्ष अनुभवताना हे द़ृश्य आजही प्रत्येकाला थक्क करून सोडते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close