अजित पवार यांनी सकाळच्या शपथविधी बाबत केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई / प्रतिनिधी
23 नोव्हेंबर 2019 लां देशात एक अशी घटना घडली होती ज्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीला खाली पाहावे लागले होते. आणि सकाळचा शपथविधी म्हणून या घटनेची इतिहासात नोंद झाली आहे. हे सरकार घक्त 80 तास टिकले होते. या घटने बाबत आजही चर्चा होते. पण अजित पवार यांनी आज या घटनेवर नव्याने भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे. त्या सरकार स्थापनेमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांचा सहभाग होता, असा उल्लेख अजित पवार यांनी केला आहे.
नेत्यांनी सांगितले तेच केले – अजित पवार
‘पाच वर्षांपूर्वी काय घडले हे सर्वांना माहिती आहे. मीटिंग कोठे झाली हेही सर्वांना माहिती आहे. तेथे सगळेच होते. पवारसाहेब, अमित शहा होते. गौतम अदानी होते. प्रफुल पटेल होते. देवेंद्र फडणवीस होते आणि मीही होतो,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. News Minute या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हा खुलासा केला आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जे नेत्यांनी (शरद पवार) सांगितले, तेच मी केले, असेही ते म्हणाले आहेत. News Minuteच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसनेही बातमी दिली आहे.
पहाटेचा शपथविधी
नोव्हेंबर २०१९मध्ये राज्यात सत्ता कोणी स्थापन करायची हा पेच निर्माण झाला होता. तत्कालीन शिवसेना आणि भाजप युतीत मतभेद तीव्र झाले होते, आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण शरद पवार यांनी अजित पवारांच्या बंडाला आपला पाठिंबा नसल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या ८० तासातच फडवणीस यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले.