वर्धे नंतर आता रामटेक मतदार संघात राष्ट्रवादीचे नाराजी नाट्य
नागपूर / नवप्रहार डेस्क
वर्धा मतदार संघात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना योगी यांच्या प्रचार सभेत निमंत्रित न केल्या गेल्याने राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांत नाराजी असतांना मोदी यांच्या कन्हान येथे झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर प्रवेश देण्यात आला नाही तसेच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भाषणाची संधी देण्यात आली नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
रामटेकमध्ये राजू पारवे हे महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आहेत. असे असतानाही प्रचारासाठी तसेच सभा, बैठकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने आधीपासूनच असंतोष आहे. या असंतोषात मोदी यांच्या सभेनंतर भर पडली आहे.
सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या ॲड. सुलेखा कुंभारे या मित्रपक्षाच्या नेत्यांची भाषणे झाली. मात्र, खासदार प्रफुल्ल पटेल व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. महायुतीची सभा असल्याने भाजप आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना सभेचे निमंत्रण नव्हते. ही बाब काही पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, निवडणुकीचा माहोल असल्याने त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळल्याचे समजते. मोदी यांची सभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कन्हानमध्येच होते. येथील पक्ष कार्यालयात ते पूर्ण वेळ बसून होते. मात्र, निमंत्रण नसल्याने ते सभेला गेले नाहीत, असे समजते.
डावलले जात असल्याचा आक्षेप-
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जिल्ह्यात जाळे नाही. राजू पारवे यांच्यासोबत त्यांच्या गावातले कार्यकर्तेही शिवसेनेत गेले नाहीत. त्यातुलनेत राष्ट्रवादीकडे अनेक चांगले व सक्षम कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य आहेत. असे असतानाही राष्ट्रवादीकडे विचारणा केली जात नाही, असा या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे.
भाजपला पारवे यांच्या माध्यमातून आपला प्रचार करायचा आहे. नाइलाज म्हणून धनुष्यबाणाला समोर करावे लागत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे नेते जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघात लढण्याची तयारी करीत आहे. विधानसभेत राष्ट्रवादीने मतदारसंघ मागू नये, याकरिता हा खटाटोप सुरू असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.