मिरवणुकीतील बॅन्जो बंद होऊन नवरदेवसह पोहचला पोलीस स्टेशनला
चांदूर रेल्वे शहरातील प्रकार
नवरदेवाची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार
पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
नवरदेव मिरवणुक किंवा लग्नाची मिरवणुक म्हटली की सहसा कोणी परवानगी काढत नाही अथवा कोणताही अधिकारी परवानगी मागत नाही. मात्र चांदूर रेल्वे शहरातील नवरदेव मिरवणुकीतील बॅन्जो बंद होऊन घरी पोहचला असता बॅन्जो ला आवाज जास्त असल्याचे कारण देत पोलीस स्टेशनला आणण्यात आले. बॅन्जो ला पोलीस स्टेशनमध्ये बोलाविल्याने नरवदेव सुध्दा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. मात्र याठिकाणी पोलीसांनी पावती न देता ३ हजार रूपये वसुल करून गैरकायदेशिररित्या गैरवर्तणुक केल्याचा आरोप नवरदेव अर्जदार चेतन भोले यांनी केला आहे. याप्रकरणी गुरूवारी (ता. १८) ग्रामिण पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करून चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, अर्जदार चेतन भोले यांचे चांदूर रेल्वे शहरातील संताबाई यादव नगर येथे फर्निचरचे दुकान असुन ते समाजकार्यात देखील अग्रेसर आहे. त्यांचे लग्न ३० मार्च रोजी होते व नवरदेव मिरवणुक २९ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघाली होती. सदरची मिरवणुक ही श्री. गजानन महाराज मंदिर पासून श्री. बाळासाहेब ठाकरे चौकापासून तर विरूळ चौकापर्यंत निघाली होती. वास्तविक पाहता नवरदेवाची मिरवणुक काढण्याकरिता कोणत्याही पुर्व परवानगीची गरज नसुन सदरची मिरवणुक ही कायदेशिररित्या सुरू होती. अशातच २९ मार्चला नवरदेवाची मिरवणुक सुरू असतांना संध्याकाळी ९ वाजून २३ मिनीटांनी चांदूर रेल्वे येथील पोलीस कर्मचारी गैरअर्जदार क्र. ३ शिवाजी घुगे हे प्रामुख्याने व सोबत इतर काही कर्मचारी आले व त्यांनी माझ्यासोबत तसेच सदरच्या वरातीमध्ये असलेल्या पाहूण्यांसोबत तसेच बॅन्जो कंपनीसोबत गैरकायदेशिररित्या गैरवर्तणुक केल्याचा आरोप चेतन भोले यांनी केला. त्यावेळेस सदर पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण वरातीने समजाविले, तेव्हा सदर पोलीस कर्मचारी त्या ठिकाणाहून तेथुन चालले गेले, परंतु गैरअर्जदार क्र. ३ हे पुन्हा इतर कर्मचारी घेवून घरी आहे व रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास बॅन्जो पार्टीला व चेतन भोले यांना पोलीस स्टेशन येथे आणले. वास्तविक पाहता, लग्न असल्याने व संपूर्ण पाहुण्यांसमोर मला वाईट वर्तवणुक करून गैरअर्जदार क्र. ३ यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आणल्याने माझी संपूर्ण कुटूंबामध्ये व समाजामध्ये बदनामी झाली असुन त्यांनी मला व बॅन्जो पार्टी यांना त्या दिवशी सोडण्याकरिता पैसे भरावे लागेल असे म्हटल्याचा आरोप भोले यांनी केला आहे. यात शेवटी तडजोड होऊन ३ हजार रूपयांची रक्कम वसुल करून त्याची पावती देखील देण्यात आली नाही असे तक्रारीत नमुद केले आहे.
सदरचे गैरकायदेशिर कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याकरिता पोलीस निरिक्षक यांच्याकडे १५ एप्रिल रोजी अर्जदार यांनी तक्रार देखील नोंदविली. सदरची तक्रार नोंदविल्यानंतर गैरअर्जदार क्र. १ उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी १६ एप्रिलला दुपारी ३.०७ वाजता फोन करून मला चांदूर रेल्वे येथील पोलीस स्टेशनमध्ये बोलविल्याचे चेतन भोले यांनी सांगितले. अर्जदार तेथे पोहचले असता उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक व कर्मचारी शिवाजी घुगे त्याठिकाणी हजर होते. त्यावेळेस गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी अशोभनिय व्यवहार केला तसेच मला खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. तसेच कलम ३५३ अन्वये कारवाई माझ्या विरुध्द करणार अशी धमकी दिल्याचा व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप चेतन भोले यांनी तक्रारीतून केला आहे. त्यामुळे अर्जदार चेतन भोले यांनी गुरूवारी (ता. १८) ग्रामिण पोलीस अधिक्षक यांनी तक्रार देऊन गैरअर्जदार क्र.१ उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे, गैरअर्जदार क्र. २ ठाणेदार चांदूर रेल्वे
आणि गैरअर्जदार क्र. ३ कर्मचारी शिवाजी घुगे व इतर कर्मचारी यांनी केलेल्या अशोभनिय व्यवहाराबद्दल व गैरकायदेशिररित्या ३ हजार रूपये वसुल केल्याबाबत योग्य ती कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी अशी मागणी अर्जदार चेतन भोले यांनी केली आहे. या तक्रारीवरून पोलीस अधिक्षक कार्यालयातून चौकशी होऊन कारवाई होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
(
कुठलाही दबाव टाकला नाही
या मिरवणुकीतील बॅन्जो मालकाला १ हजार रूपयांचा दंड दिला असुन मिरवणुकीच्या दिवशीच रात्री १०.५५ वाजता याची पावती बनविण्यात आली. तसेच अर्जदार यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी दिली नसुन तक्रार मागे घेण्यासाठी सुध्दा दबाव टाकण्यात आलेला नाही. सदर आरोप चुकीचे आहे.
आयपीएस आशित कांबळे
उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे
योग्य कारवाई होऊन न्याय द्यावा
गैरअर्जदार क्र. १ उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून म्हटले की, मी सहा पोलीस स्टेशनचा प्रमुख असुन माझा कोणीही काहीही वाकडा करू शकत नाही. त्यामुळे गैरअर्जदारांना कायद्याचा काहीही भय व सन्मान राहीलेला नाही. त्यामुळे माझ्याकडून पैसे उकडणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्यावर व मला धमकी देणाऱ्या गैरअर्जदार यांच्यावर पोलीस अधिक्षक साहेबांनी चौकशी करून कारवाई करावी. व माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय द्यावा हीच अपेक्षा.
चेतन भोले
अर्जदार, चांदूर रेल्वे