अखेर कुटुंबियांनीच लावला आरोपीचा शोध
प्रकरण केक खाल्ल्याने झालेल्या मृत्यूचे
पटियाला (पंजाब )/ नवप्रहार मीडिया
वाढदिवसावर मागविलेला केक खाल्ल्याने 10 वर्षीय तरुणीचा झालेल्या मृत्यू प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्या बेकरीतून कुटुंबियांनी केक मागवला होता, तपासात हे दुकानचं अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुलीच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय उपस्थित होतोय.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मुळची पंजाबची रहिवासी असलेल्या 10 वर्षीय मुलीचा वाढदिवस हा 24 मार्च रोजी होता. आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आईने झोमॅटोवरून केक मागवला होता. त्यानंतर कुटुंबियांनी मिळून केक कापून मुलीचा वाढदिवस साजरा केला होता. केक खाल्यानंतर अचानक मुलीची तब्येत खराब झाली. त्यामुळे कुटुंबियांनी तिला रूग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
या मृत्यूनंतर संतापलेल्या कुटुंबियांनी ज्या दुकानातून केक मागवला होता. त्या दुकानाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानाची चौकशी केली असता तपासात अशाप्रकारच दुकानच अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कुटुंबियांना मोठा हादराच बसला होता. त्यामुळे आता नेमका कोणी केक घरी पाठवला होता? असा प्रश्न उपस्थित होत होता.
अखेर या प्रकरणात मुलीच्या कुटुंबियांनीच केकच्या दुकानाचा मुळ मालक शोधण्यासाठी स्वत:हून प्रयत्न सुरू केला. यासाठी कुटुंबियांनी पुन्हा एकदा 30 मार्चला झोमॅटोवरून केक मागवला. हा केक जसा घरी डिलिव्हर झाला तसा कुटुंबियांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतल्यानंतर ज्या दुकानातून त्याने केकची ऑर्डर घेतली होती. त्या दुकानात त्याला नेण्यास सांगितले होते. पोलीस ज्यावेळेस दुकानात पोहोचली, त्यावेळेस तिकडे भलतंच दुकान सुरु होते. आणि ज्या दुकानावरून ऑनलाईन केक मागवला गेला होता ते दुकान अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे पोलीस देखील बुचकळ्यात पडली होती.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दुकान मालकाची चौकशी केली असता खरं सत्य समोर आलं. बेकरी मालकाने ‘कान्हा फर्म’च्या नावाने बेकरी रजिस्टर केली होती. आणि ऑनलाईन डिलिव्हरीसाठी त्यांनी ‘न्यू इंडिया’च्या नावाचा वापर केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी बेकरी मालकाच्या विरूद्ध कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सध्या बेकरीतल्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तर बेकरी मालक फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.