भरकटलेल्या तरुणाईला बुद्ध धम्मच वाचवू शकतो. … एडवोकेट अशोक रोडे
धामणगाव रेल्वे ,५ मे : स्थानिक जीवक बुद्ध विहार, पुष्करणा नगर, धामणगाव रेल्वे येथे आज बुद्ध जयंती निमित्य ‘ बुद्ध गीतांची संगीतमय सकाळ’ तसेच प्रबोधनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मा. राजेश मनोहर हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट अशोक रोडे (अमरावती), हे उपस्थित होते. प्रास्ताविक संयुक्त उत्सव समितीचे सचिव गौतम शेंडे यांनी तर संचालन मिलिंद वहिले यांनी केले. कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता पंचशील ध्वजारोहण करून करण्यात आली. बुद्ध वंदनेने बुद्ध गीतांची संगीतमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावातील महिला मंडळाच्या बहारदार बुद्ध गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत. त्यानंतर लगेच प्रबोधन पर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट अशोक रोडे यांनी ‘आजच्या तरुणांना धम्माची गरज का ?’ या विषयावर विचार व्यक्त करताना सामाजिक, धार्मिक, आर्थिक , राजकीय आणि सांस्कृतिक या सर्व अंगाने बुद्धाचा विज्ञानवादी धम्म संपूर्ण जगाचे कल्याण करू शकतो, हे त्यांनी आयपीसीचे अनेक कलमे तसेच संविधानातील अनेक अनुच्छेदांचा दाखला देऊन आणि कोर्टातील अनेक खटल्यांच्या उदाहरणांनी पटवून दिले. बेरोजगारीच्या, व्यभिचाराच्या, व्यसनाधीनतेच्या आणि गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांना बुद्धाचा धम्मच विवेक वादी, विज्ञाननिष्ठ आणि खऱ्या अर्थाने माणूस बनवू शकतो, असे सांगितले. अध्यक्षिय अभिभाषण मा. राजेश मनोहर यांनी केले तर मा. राजेश डोंगरे यांनी अतिथींचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री अनिल डोंगरे, सुधीर नगराळे, हेमंत लोणारे , अतुल शंभरकर , डॉ. संजय शामकुवर , सुधाकर टोकसे, ईश्वरदास बागडे, अंकुश कोंडेकर, देवेंद्र इटीवाले , भीमराव सहारे, रामरावजी वानखडे…………….. इत्यादींनी तसेच संयुक्त उत्सव समितीचे सर्व सदस्य, जीवक सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन संस्थेचे सर्व सदस्य, प्रजापिता महिला संघ, रमाई महिला संघ व भिमाई महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले.