रुद्रापूर ते कासराळी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघात वाढले
बिलोली (प्रतिनिधि):
तालुक्यातील कासराळी ते रुद्रापूर हा जिल्हा मार्ग क्रमांक ४७ असून सार्वजनिक विभागातंर्गत ३ कि मी. चा रस्ता आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम फक्त १ कि.मी. असून दि. २० मार्च २०२४ रोजी या रस्त्याच्या खोदकामाची सुरुवात करण्यात आली. गुत्तेदारच्या दिरंगाईमुळे हे काम गेल्या ४ महिण्यापासून कासवगतीने होत असल्याने वाहन शाळेची बस गावापासून १ किमी अंतरावर हे उभी राहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून पायपीट करावी लागत आहे.
अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. कासराळी ते रुद्रापूर रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम गुत्तेदारास दिल्यानंतर ४ महिण्यापुर्वी या रस्त्याच्या खोदकामाला सुरुवात झाली. ते आजपर्यंत पुर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांसाठी मानव विकासाची बस गावापासून १ कि.मी. अंतरावर उभी राहत आहे. येथील ६० ते ७० लहान मुले-मुली १ कि.मी. अंतरावर ये-जा करतात. धावपळीत त्यापैकी काही लहान मुले चिखलावरुन पाय घसरुन पडण्याच्या घटना दररोज घडत आहेत. रस्त्याचे खोदकाम करुन त्यावर पांढऱ्या मुरमा ऐवजी लाल माती टाकून दवाई करून ठेवली आहे. पावसामुळे पूर्ण चिखल होऊन रस्ता खचून गेला आहे. ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनांच्या अपघातामुळे चालकांना गंभीर दुखापती होत आहेत.
काम अर्ध्यावर सोडल्यामुळे गावकऱ्यांना चिखलातून कसरत करीत ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे एसटी बस सुद्धा बंद झाल्या आहेत. शाळेला जाण्यासाठी ६० ते ७० विद्यार्थी चिखलातून रस्ता काढीत जातात. लहान मोठ्यांना या रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे. सरपंच प्रतिनिधी अर्जुन शेळके व कमलाकर जमदाडे यांनी या प्रकरणी गुत्तेदाऱ्यास विचारणा केली असता त्याने या रस्त्यासाठी बजेट नसल्याचे कारण सांगितले, रस्त्यासाठी निधी येवून सुद्धा गुत्तेदार काम पूर्ण करत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.