एक फुल दोन माळी मध्ये गेला युवकाचा बळी
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
27 डिसेंबर रोजी पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस मृतदेह आढळुन आला होता. तपासात तो मृतदेह माहीर नावाच्या युवकाचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन माहीर च्या मरेकऱ्यांना अटक केली आहे. या हत्येमागे प्रेम त्रिकोण असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
मृत तरुणाचं नाव माहिर असं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अरमान (वय 18) व त्याचे साथीदार फैसल (वय 21) आणि मोहम्मद समीर ( वय 19) यांना अटक केलीय.
बुधवारी (27 डिसेंबर 2023) रोजी भागीरथी विहारमध्ये रस्त्याच्या कडेला एक बेवारस मृतदेह पोलिसांना सापडला होता. अधिक तपास करता, तो मृतदेह माहिरचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात खुनाचा दाखल करून तपास सुरू केला असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
असा केला पोलिसांनी तपास
माहिरचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात माहिरच्या शरीरावर चाकूनं वार केल्याचं आढळलं. पोलिसांनी घटनास्थळावरून खुनात वापरलेला चाकू जप्त केला, फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जीटीबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
माहिर मध्य दिल्लीतल्या पहाडगंजमधल्या फ्लेक्स निर्मिती कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत असल्याच पोलीस तपासात समोर आलं. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं, मृत व्यक्तीचे कॉल डिटेल्स काढले. त्या वेळी माहिरचा खून होण्यापूर्वी तो एका व्यक्तीसोबत फोनवर बोलत असल्याचं समोर आलं. हा धाग पकडून पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता ती व्यक्ती अरमान असल्याचं समोर आलं. त्याच्याकडे चौकशी केली असता खुनाचं रहस्य उलगडलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरमान आणि मृत माहिर दोघंही एकाच मुलीला डेट करीत होते. या मुलीची भेट इन्स्टाग्रामवर झाली होती. संबंधित मुलीने माहिरशी बोलू नये, असं अरमानला वाटत होतं. यावरून दोघांमध्ये भांडण झालं. एकदा अरमाननं व्हिडिओ कॉल करून माहिरला शिवीगाळही केली होती. संबंधित मुलगी नेहमी माहिरची बाजू घेत असल्याचं अरमानला वाटत होतं.
अरमानने संबंधित मुलीचा मोबाईलही हिसकावून घेतला होता. तसंच माहिरचा बदला घेण्याचं ठरवलं होतं. अखेर मुलीचा फोन परत करण्याच्या बहाण्यानं अरमानने माहिरशी संपर्क साधला व त्याला फोन परत घेऊन जाण्यास सांगितलं. माहिर हा फोन घेण्यासाठी गेला असता अरमानने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं माहिरवर चाकूनं हल्ला करीत त्याचा खून केला.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित मुलीचा जबाब घेतला असून, इतर पुराव्यांच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गोकलपुरी भागात जोरदार चर्चा सुरू आहे.