अकोल्यात वादळी वारा: अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली; एक गंभीर जखमी
,तर उन्हाचा पारा सलग चौथ्या दिवशीही कायम
अकोला:-गेल्या चार पाच दिवसांपासून प्रचंड तापमानाचा सामना करताना अकोलावासी त्रस्त झाले होते. आज सायंकाळी पाच वाजता आलेल्या जोरदार वादळ वाऱ्यामुळे किंचित दिलासा मिळाला आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागात वादळामुळे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. शहरात एका ठिकाणीं झाड अंगावर पडल्याने इसम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर पातूर, बाळापूर तालुक्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला.
अकोल्यात आज सकाळपासून उकाड्याने हैराण नागरिकांनी सायंकाळी गारवा अनुभवला. सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सायंकाळी अचानक जोरदार वार सुटला या वाऱ्यामुळे संपूर्ण शहरात धूळ पसरली होती. या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल आहे. तर काही ठिकाणी झाड उल्मळून पडले आहेत. मात्र अद्यापही या जोरदार वाऱ्यामुळे कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, वादळाच्या वेळी अकोला शहरातील खदान भागातील सरकारी गोदामासमोर विशाल काय झाड उन्मळून पडले. यावेळी रस्त्याने वाहनांची रहदारी होती. वाहनधारक यामधून कसेबसे वाचले. मात्र रस्त्याने पायी चालत असलेले अंदाजे 60 वर्षांचे इसम झाडा खाली दबल्या गेले. यामधे हा इसम गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ ही माहिती अकोला जिल्हा प्रशासनाला कळवली. प्रशासनाने तातडीने कारवाई करुन या इसमास सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. इसमाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दुसऱ्या घटनेत वादळ वारा वेळी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यासमोरील एका फळ विक्रेत्याची आंब्यांनी भरलेली बैलगाडी जोरदार वादळात जळून खाक झाली. त्यात ठेवलेले आंबेही पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने गाडीला बैल जुंपलेले नव्हते. यावेळी परिसरात खळबळ उडाली होती.
ग्रामीण भागातही वादळ वारा
दरम्यान ग्रामीण भागात वादळामुळे शेत शिवाराचे प्रचंड नुकसान झाले. मळसुर येथे चक्रीवादळमुळे अनेक घरावरचे टीन पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. विद्युत पोलही पडले. या गावात 70 वर्षात सुद्धा अशी परिस्थिती झाली नाही, अश्या प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पातूर, बाळापूर तालुक्यात अवकाळी पाऊस
अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात आज सायंकाळीं वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस देखील पडला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली. पातूर तालुक्यातील सस्ती आलेगाव, चान्नी परिसरात अनेकांच्या घराची टिनपत्रे उडून गेली. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेची तार तुटली तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकले आहे. यामुळे पातूर तालुक्यातील अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पातूर तालुक्यातील सस्ती आलेगाव, चान्नी परिसरात अनेकांची टिनपत्रे उडून गेली. झाडे कोलमडली. विजेचे तार तुटून पडले. विजेचे खांब वाकले. तालुक्यातील अर्ध्या गावातील बत्ती गुल झाली असल्याचे वृत्त आहे.