नदीपात्रात पाय घसरून पडुन दोन वर्षीय चिमुकल्याचा दुदैर्वी मुत्यु
वरूड/तूषार अकर्ते
शनिवारी दि.५ ऑगस्ट रोजी दोन वर्षीय चिमुकल्याचा नदी पात्रात पडुन दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली आहे. उज्वल सुभाष उईके असे मृत बालकाचे नाव आहे. वरूड येथून जवळच असलेल्या वडाळा या गावात गेल्या अनेक वर्षांपासून मध्यप्रदेशातील काही आदिवासी मजूर स्तलांतरित झाले आहे. गावातील नदी काठच्या पडीत जमिनीवर त्यांनी वस्ती केली आहे. सकाळच्या सुमारास उज्वल सुभाष उईके (२), हा त्याचा चुलत भाऊ विर राजेंद्र उईके (४) व चिकू आपल्या मित्रासोबत घराशेजारी खेळत होता. खेळता खेळता हे तिघेही घराजवळ असलेल्या झिरी नदी पात्राकडे गेले. पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे.ते काठावर खेळत असतांना उज्वल उईके याचा पाय घसरला व तो नदी पात्रात पडला असता त्याच्या सोबत खेळत असणारे त्याचे दोन सहकारी मित्र हे दोघेही घराकडे पळत गेले व उज्वल पाण्यात पडल्याचे सांगितले. या वेळी उज्वलची आई ही मजुरीसाठी गेली होती तर त्याचे वडील गेल्या दोन दिवसापूर्वी कामानिमित्य मध्यप्रदेशमध्ये गेले होते.अशा वेळी घराशेजारी असलेल्यानी नदीकडे तात्काळ धाव घेतली असता त्यांना उज्वलचा मृतदेह वाहून जाताना दिसला. तेव्हा काही नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेची माहिती बेनोडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला.या प्रकरणाचा पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहे.