विद्यार्थ्यांच्या घास व्यापाऱ्यांच्या घशात ; शालेय पोषण आहारात घोटाळा
शाळेत जाणारे धान्य व्यापाऱ्याच्या गोदामात
वर्धा / नवप्रहार मीडिया
सेवाग्राम येथे शालेय पोषण आहारात झालेल्या घोटाळ्यानंतर आता हिंगणघाट येथे आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. पोलिसांनी हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी तयारी चालवली आहे.
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पोहचविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराची खासगी गोदामात साठवणूक केल्याची घटना समोर आली होती. पोलीस विभाग अॅक्शन मोडवर आले असून नांदगाव शिवारातील लक्ष्मीनारायण विठ्ठलदास डागा यांच्या शेतात असलेल्या गोदामात छापा मारला. यात शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे तब्बल ५० किलो वजनाचे ९० पोते असा एकूण ४,५०० किलो तांदूळ आणि ५२३ नग रिकामे पोते, असा एकूण १ लाख १ हजार ६१५ रुपयांचा धान्यसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी विलास बाळकृष्ण वाघमारे (४४), अक्षय प्रकाश भांडवलकर (२९), संजय किशोर कनोजिया (४७) सर्व रा. हिंगणघाट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी मध्यरात्री वर्धा शहरातील औद्यागिक वसाहतीतील किशोर तापडीया याच्या गोदामातून शालेय पोषण आहारातील २५ क्विंटल तांदूळ जप्त करीत पुरवठादारासह तिघांना बेड्या ठोकल्या. हा प्रकार जिल्ह्यात सर्वत्रच सुरू असल्याने त्याच रात्री पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाटातील दोन आणि कारंजातील एक गोदाम सील करण्याचे आदेश दिले.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विस्तार अधिकारी ललीतकुमार बारसागळे यांनी पोलिसांसह नांदगाव रस्त्यावर असलेल्या गोमादात जात तपासणी केली. त्यावेळी आरोपी अक्षय भांडवलकर तेथे उपस्थित होता. त्याला धान्य साठ्याबाबत विचारणा केली असता त्याने संजय कनोजीया हे विलास वाघमारे याच्या सांगण्यावरुन समुद्रपूर, सेलु, तालुक्यातील जि.प. शाळांना पुरविण्यासाठी येणारा शालेय पोषण आहार गोदामात साठवल्याचं सांगितले.
रात्रीच्या सुमारास गोदामाची पाहणी केली असता गोदामात ५० किलो वजनाचे ९० सिलबंद असलेले तसेच त्यावर एफसीआय गोदाम वर्धा येथील कागदी लेबल लावलेले तांदळाचे पोते, तसेच ५२३ रिकामे पोते, असा एकूण एक लाखांच्यावर धान्यसाठा जप्त करीत तिघांना ताब्यात घेत गोदामाला सील ठोकले. आरोपींना गोदाम किरायाने घेतल्याचा तसेच शाळांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्याबाबतचा करार नाम्याबाबत विचारणा केली.
आरोपींनी कुठलाही करारनामा त्यांच्याकडे नसल्याचे दिसून आले. पोषण आहारातील धान्यसाठा नियमानुसार थेट शाळेत घेऊन जाणे अपेक्षित असतानाही तसे न करता आरोपींनी नियमबाह्य कार्य करीत पोषण आहारातील धान्य खासगी गोदामात जादा दराने विक्री करण्यासाठी अवैधरित्या साठवणूक करुन ठेवल्याचे निष्पन्न झाले. हिंगणघाट शहरातील दोन गोदाम ३० रोजी मध्यरात्रीच सील करण्यात आले होते. १ रोजी सायंकाळी नांदगाव शिवारातील गोदामाची तपासणी केली असता शालेय पोषण आहारातील तांदूळ आढळून आला.
तसेच सील केलेल्या दुसऱ्या गोदामातही मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असून तपासणी झाल्यावरच हे समजणार आहे. कारंजा येथील गोदाम १ रोजी सील करुन गटशिक्षणाधिकारी महेंद्र महाजन यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, गटशिक्षणाधिकारी महेंद्र महाजन यांनी मोबाईल स्विचऑप करुन पसार होत तक्रार देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हेतर त्यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर रजेचा अर्जही पाठविल्याची खात्रीशीर माहिती आहे.