पती ठरत होता प्रेमातील काटा,पत्नी आणि प्रियकराने मिळून केला पत्ता कट

बागपत/ विशेष प्रतिनिधी
प्रेमात मनुष्य आंधळाच होत नाही तर तो स्वार्थी देखील होतो. त्यामुळे त्याच्या मनातून प्रेम, दया ,ममता यासारखे शब्द हद्दपार होतात. प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीच्या हत्येचा कट रचला.आणि तो प्रत्यक्षात उतरवला.पण पोलिसांपुढे त्यांची चालबाजी काही चालली नाही आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.
एका अत्यंत खळबळजनक आणि थरारक हत्येची बातमी समोर आली आहे. प्रियकरासोबत नवीन आयुष्य जगण्याच्या वेडापोटी एका पत्नीने नवऱ्याची हत्या केली आहे. मृत पतीचे नाव प्रमोद असे आहे.
ही हत्या करण्यासाठी तिने रचलेला कट अंगावर काटा आणणारा आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी उर्मिला आणि तिचा प्रियकर सिकंदर या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील ही घटना आहे.
शेतात आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, रामलीला पाहण्यासाठी घराबाहेर पडलेला प्रमोद पुन्हा घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह शेतातील एका कूपनलिकेजवळ अत्यंत छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कसून चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासातच प्रमोदची पत्नी उर्मिला आणि तिचा प्रियकर सिकंदर यांच्यातील अनैतिक संबंधांचा धागा पोलिसांच्या हाती लागला.
मेकॅनिकच्या प्रेमात झाली वेडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर हा एक मोटारसायकल मेकॅनिक असून त्याने प्रमोदचेच एक दुकान भाड्याने घेतले होते. याच दरम्यान उर्मिला आणि सिकंदर यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. परंतु, उर्मिलाच्या मुलाला त्यांच्या या प्रकरणाची कुणकुण लागल्याने सिकंदरचे घरी येणे-जाणे बंद झाले, तरीही ते फोनवर सतत संपर्कात होते. या दोघांना डेहराडूनला जाऊन नवीन आयुष्य सुरू करायचे होते, त्यासाठी त्यांनी प्रमोदचा काटा काढण्याचा भयानक कट रचला.
हत्येविषयी व्हॉट्सॲपवरून अपडेट
या कटाची अंमलबजावणी करताना उर्मिलाने सिकंदरला झोपेच्या गोळ्या आणि सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी शेतामधून जाण्याचा खास मार्ग सांगितला. सिकंदरने प्रमोदला दारूमध्ये गोळ्या मिसळून पाजले आणि नशेत असतानाच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, हत्येविषयी उर्मिला व्हॉट्सॲपवरून सतत अपडेट घेत होती. व्हॉट्सॲप चॅट्स आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला.




