शिक्षकाचे कृत्य प्रेयसीचा चंद्रपुरात खून आणि मृतदेह पुरला नागपुरात

चंद्रपूर येथील शिक्षक संतोष साखरकर असे प्रेमसंबंधातून प्रेयसीचा गळा आवळून खून करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. संतोषने वैशाली टिपले हीचा 14 ऑक्टोबरला चंद्रपूर येथे खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन संतोषने नागपुरातील हिंगणा भागातले आपले घर गाठले.
भयानक म्हणजे, घरातच एक खड्डा खणून संतोषने प्रेयसी वैशालीचा मृतदेह घरात पुरला होता. अखेर चंद्रपूर पोलिसांनी हिंगणा पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढल्याने परिसरात खळबळ उडाली
14 ऑक्टोबरला दोघांमध्ये भांडण झाले. संतोषने वैशालीवर जड वस्तूने प्रहार करत नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याने हिंगणा भागातील आधार नगरी येथील घर गाठले. संतोषने काही वर्षांपूर्वी हिंगणा येथील आधारनगरी परिसरात एक घर खरेदी केले होते. सध्या हे घर रिकामे होते. याच संधीचा फायदा घेत त्याने 15 ऑक्टोबर रोजी कारच्या डिक्कीतून मृतदेह घरात आणला. घराच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत खड्डा खोदून त्याने मृतदेह पुरला. त्यानंतर खड्ड्यावर फरशी बसवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य केल्यानंतर तो पुन्हा चंद्रपूरला परतला.
वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार चंद्रपूर पोलिसांत दाखल झाली होती.
दरम्यान, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने वैशालीचा मोबाईल फोन प्रवासादरम्यान रेल्वेच्या एका बोगद्यात फेकून दिला. दुसरीकडे वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान तिचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. त्यावरील संपर्कांचा तपशिल तपासत असताना पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली देत मृतदेह हिंगणा येथील घरात पुरल्याचे सांगितले.




