क्राइम

बाळाचा सांभाळ करण्यास येत असलेल्या 14 वर्षाच्या मुलीसोबत नवऱ्याचे अनैतिक सबंध अन्……

Spread the love
बागपत / विशेष प्रतिनिधी 
 
                   घरी बाळाचा सांभाळ करण्यासाठी येत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत त्याचे अनैतिक सबंध जुळले. ही बाब पत्नीला कळल्यावर त्यांनी तिचा खून करत मृतदेह बागपत जवळील दिल्ली-सहारनपूर महामार्गावर असलेल्या काठा गावातील स्मशानभूमीच्या भिंतीजवळ ठेवला. ओळख लपविण्यासाठी तिच्या तोंडावर ॲसिड आणि पेट्रोल टाकून ओळख लपविण्याचा प्रयत्न केला.पण पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींना शोधून काढले. या घटनेनंतर मात्र 2 वर्षाचे निरागस बाळ आई आणि वडिलांच्या मायेपासून पोरके झाले आहे.
 बागपत जवळील दिल्ली-सहारनपूर महामार्गावर असलेल्या काठा गावातील स्मशानभूमीच्या भिंतीजवळ अंदाजे 14 वर्षाच्या मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्यामुळे पोलिसांसमोर या ‘ब्लाईंड मर्डर’चे गूढ उकलण्याचे आणि मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे दुहेरी आव्हान होते. आगीमुळे लोक जमा होतील या भीतीने आरोपींनी मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच सोडून तिथून पळ काढला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.

600 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले

या आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी महामार्गावरील सुमारे 600 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 2 हजारांहून अधिक वाहनांची कसून तपासणी केली. या तपासादरम्यान 12 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी एक नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची स्कूटी पोलिसांच्या निदर्शनास आली. या स्कूटीवर एक पुरुष, एक महिला आणि त्यांच्या पायाजवळ एक पांढऱ्या रंगाचे संशयास्पद पोते असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या धाग्यावरून तपास करत पोलीस दिल्लीतील उस्मानपूर परिसरातील शास्त्री पार्क येथे पोहोचले. तिथे अमन सागर नावाचा व्यक्ती आपली पत्नी रचना, दोन वर्षांचे बाळ आणि 14 वर्षीय परीसोबत भाड्याने राहत होता. विशेष म्हणजे, ज्या दिवशी मृतदेह सापडला त्याच दिवशी (13 ऑगस्ट) अमनने घर खाली केल्याची माहिती घरमालकाने दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

सीआयडी पाहून रचला कट

अमन सागर मूळचा मथुरेचा असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मथुरेत तपास सुरू केला, जिथे त्यांना या प्रकरणातील सर्वात मोठा दुवा सापडला. 17 एप्रिल 2026 रोजी मथुरा हायवे पोलीस ठाण्यात अमन विरोधात 14 वर्षीय परीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सर्व धागेदोरे जुळवून अमन आणि त्याची पत्नी रचना यांना हातरस येथून ताब्यात घेतले व डीएनए चाचणीद्वारे मृतदेह परीचाच असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, परी अमनच्या बाळाला सांभाळण्यासाठी येत असे आणि त्यातूनच परी व अमन यांच्यात जवळीक वाढून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. यावरून रचना आणि अमनमध्ये सतत वाद होत असत. याच वादातून ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सीआयडी’ सारख्या मालिकांमधून कल्पना घेऊन या जोडप्याने परीचा गळा दाबून खून केला आणि स्कूटीवरून मृतदेह नेऊन स्मशानभूमीजवळ विल्हेवाट लावली.

नवऱ्याच्या गुन्ह्यात बायकोची साथ

केवळ 25 दिवसांत पोलिसांनी या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा छडा लावला असला तरी, या घटनेने व्यवस्थेवर आणि समाजावर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. एप्रिल महिन्यातच परीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मथुरा पोलिसांनी तातडीने आणि पोक्सो कायद्यांतर्गत कडक कारवाई करत तिचा शोध घेतला असता, तर कदाचित परीचा जीव वाचला असता. दुसरीकडे, रचनाने एका अल्पवयीन मुलीला सुरक्षित घरी पोहोचवण्याऐवजी किंवा पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी नवऱ्याच्या क्रूर गुन्ह्यात साथ दिल्याने तीही तितकीच दोषी ठरली आहे. आता या गुन्हेगार पती-पत्नीला तुरुंगाची हवा खावी लागणार असून, त्यांच्या या भयंकर कृत्यामुळे त्यांच्या स्वतःच्या दोन वर्षांच्या निरागस बाळाचे भविष्य मात्र अंधारात ढकलले गेले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close