बाबा…. रे…बाबा माजी डीजीपी सह कुटुंबीय मुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडकले

पंचकुला /प्रतिनिधी
एक माजी पोलिस महासंचालक आणि त्यांचे कुटुंबीय एका गंभीर गुन्ह्यात अडकले आहे. त्यांचा मूलगा अकिल अख्तर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि कुटुंबीय गोत्यात आले आहेत त्यांची पत्नी आणि पंजाबच्या माजी मंत्री रझिया सुलताना, मुलगी आणि सून यांच्यावर हत्येचा आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणातील पंचकूला येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा अकीलचा त्याच्या घरी मृत्यू झाला होता.
३५ वर्षीय अकील अख्तर हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. १६ ऑक्टोबरच्या रात्री पंचकूला येथील घरी त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. कुटुंबाने सुरुवातीला अकीलचा मृत्यू औषधांचा ओव्हर डोस झाल्याने झाल्याचे पोलिसांना सांगितले आणि त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच अकील अख्तरला मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणात अकीलच्या शेजारी शमशुद्दीन यांनी अवैध संबंधांचे आणि हत्येच्या कटाचे गंभीर आरोप पंचकूलाच्या पोलीस आयुक्तांकडे केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. शमशुद्दीन यांनी आरोप केला की, अकीलची पत्नी आणि त्याचे वडील यांचे अनैतिक संबंध होते आणि यात अकीलची आई रझिया सुलताना यांचाही सहभाग होता. या संबंधांना विरोध केल्यामुळे कुटुंबाने मिळून अकीलच्या हत्येचा कट रचला.
मृत अकीलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर
अकीलच्या मृत्यूनंतर २७ ऑगस्टचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अकीलने स्पष्टपणे म्हटले आहे की, “माझे कुटुंब मला मारण्याचा कट रचत आहे. माझे वडील आणि पत्नीचे अवैध संबंध आहेत आणि माझी आई व बहीणही या कटात सहभागी आहेत.” हे प्रकरण कौटुंबिक वादातून हत्येकडे वळल्याचे या व्हिडिओमुळे स्पष्ट होत आहे.
शमशुद्दीन यांच्या तक्रारीवरून पंचकूला एमडीसी पोलीस ठाण्यात मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी रझिया सुलताना, सून आणि मुलगी यांच्याविरुद्ध नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद मुस्तफा हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांना पाच शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. २०११ मध्ये डीजीपी पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले होते आणि नवज्योत सिंह सिद्धू यांचे सल्लागारही राहिले आहेत. त्यांची पत्नी रझिया सुलताना या कॅबिनेट मंत्री होत्या आणि २०२१ मध्ये त्या आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.
दरम्यान, अकील अख्तरचे पार्थिव मूळ गाव उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील हरडा गावात आणून दफन करण्यात आले. या हाय-प्रोफाइल हत्येच्या आरोपामुळे पंजाब-हरियाणा राजकारणात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता अधिक तपास करत आहेत.