रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

चंद्रपूर / नवप्रहार ब्युरो
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे रुग्णवाहिका आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान घडली आहे. तेजस मोरेश्वर हांडेकरं(२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुसरा सहकारी ताराचंद शेंडे (वय ३५) हा जखमी झाला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील ताराचंद शेंडे यांचे इलेक्ट्रिकचे छोटेसे दुकान आहे. आज शुक्रवारी दुपारी शेंडे व तेजस मोरेश्वर हांडेकर हे इलेक्ट्रिकचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून नागभीड येथे गेले होते. सामान खरेदी करून दोघेही परत जात असताना त्यांनी टी-पॉईंटवरील नायरा पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरले आणि गावाच्या दिशेने निघाले.
दरम्यान, नागभीड येथील टी-पॉईंटवर नागभीड वरून शंकरपूरकडे जाणाऱ्या बोलेरो ॲम्बुलन्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत दुचाकीवरील दोघेही खाली पडले. तेजस हांडेकर गंभीर जखमी झाला तर ताराचंद शेंडे किरकोळ जखमी झाला. उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना लागवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
तेजसची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे, जखमी ताराचंद शेंडे याच्यावर नागभीड येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
मृत तेजस हांडेकर हा ताराचंद शेंडे यांच्याकडे इलेक्ट्रिक काम शिकत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. घरातील तरुण सदस्याच्या अकस्मात मृत्यूने गोविंदपूर गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी बोलेरो ॲम्बुलन्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.