क्राइम

महिलेशी अश्लील कृत्य करून धमकावणाऱ्या भोंदू बाबाला अटक

Spread the love

नागपूर /प्रतिनिधी

                     कुटूंबा वरील संकट दूर करून देण्याच्या थापा मारत महिलेच्या घरात प्रवेश करण्याच्या बेतात असलेल्या भोंदू बाबा विरोधात महिलेने तक्रार केल्याने पोलिसांनी या बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. या बाबाने महिले सोबत अश्लील कृत्य केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

त्याने महिलेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती. तसेच महिलेला त्याने नग्न पूजेचा व्हिडिओदेखील पाठविला होता. अखेर महिलेने हिंमत दाखवून पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

हबिबुल्ला मलिक ऊर्फ मामा ऊर्फ लाल बाबा ऊर्फ अनवर अली मुल्लीक (५५, प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो स्वत:ला तांत्रिक म्हणवून घेतो व संकटात असलेल्या महिला-पुरुषांचा शोध घेत असतो. तक्रारदार महिलेचा पतीशी घरगुती कारणांवरून बऱ्याच दिवसांचा वाद सुरू होता व ही बाब हबिबुल्लाला कळाली. त्याने मी तुझी समस्या तंत्रमंत्राने दूर करू शकतो, असा दावा केला व महिलेशी ओळख वाढवली. त्याने त्यानंतर तिच्या पतीशी मैत्री केली व त्या माध्यमातून त्यांच्या घरात प्रवेश मिळविला. तो तिचा पती नसताना जानेवारी २०२४ पासून घरी येऊ लागला. त्याने तिला मेणबत्ती व दिवा लावून पूजा करतानाचा नग्न व्हिडीओ पाठविला होता व तुझ्यासाठीच हे तंत्रमंत्र सुरू असल्याचा दावा केला. महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने घरी येत तिच्याशी लगट सुरू केली व काही वेळा तिच्यासोबत अश्लील कृत्यदेखील करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तंत्रमंत्राने तिचा मुलगा व पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून महिला गप्प बसली. काही दिवसांअगोदर त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हादरलेल्या महिलेने अखेर पाचपावली पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पोलिसांनी हबिबुल्लाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

चहाच्या टपऱ्यांवर हेरायचा सावज
भोंदूबाबा व त्याच्या भागात ‘मामा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हबिबुल्लाच्या टार्गेटवर कष्टकरी व गरीब लोक असायचे. तो सर्वसाधारणत: परिसरातील चहा टपऱ्यांवर जाऊन थांबायचा. तेथे घरातील समस्या लोक बोलत असताना तो त्यांना हेरायचा व मी काळी जादू करू शकतो असे म्हणत त्यांना जाळ्यात ओढायचा. त्याने अशा पद्धतीने आणखी महिलांनादेखील फसविले आहे का याचा शोध सुरू आहे.

नग्न व्हिडिओ पाठवून मानसिक दबाव
मी काळी जादू जाणतो असे हबिबुल्लाने महिलेला म्हटले होते. त्याने तिला नग्न पूजा करत व्हिडिओ पाठविला होता. तो पाहून महिला हादरली होती. मात्र त्याने या माध्यमातून तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तो मूळचा पश्चिम बंगालमधील असून, मागील २० वर्षांपासून नागपुरातच स्थायिक आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close