ठाणे /नवप्रहार ब्युरो
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आर. एस. दमानिया इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लज्जास्पद प्रकार घडला आहे. येथील मुख्याध्यापिकेने जे केले त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम तर झालाच आहे. सोबत पालक वर्ग देखील संतापला आहे. पालकांनी मुख्याध्यापिकेच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने शाळा प्रशासनाने मासिक पाळीच्या संशयावरून मुलींना कपडे उतरवून तपासणीस भाग पाडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी शाळेवर धाव घेत तीव्र निदर्शने केली. विद्यार्थिनींच्या मनावर खोल आघात करणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची जोरदार मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग दिसल्यानंतर
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग दिसल्यानंतर शाळा प्रशासनाने इयत्ता ५वी ते १० वीतील काही विद्यार्थिनींना संशयाच्या आधारे विवस्त्र करून तपासणी केली. या अत्यंत लज्जास्पद कृतीमुळे मुलींचे मानसिक संतुलन ढासळले असून, पालकांचा रोष उफाळून आला आहे. “शाळा ही शिकवण्याची जागा असावी, परंतु येथे मुलींना लज्जास्पद अवस्थेत आणलं गेलं,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकांनी दिली.
मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी
या घटनेवर शिक्षण विभागाने तातडीने दखल घेण्याची गरज असून, संबंधित प्रशासन व मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे. “जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन संबंधितांवर अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही येथेच ठाण मांडून बसणार,” असा इशारा पालकांनी दिला आहे.
शाळा प्रशासनाकडून अद्याप या प्रकारावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, पोलिस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली असून, पुढील तपास सुरू आहे.