येरवडा तुरुंगात कसाबचे भूत ? काय म्हणाले निवृत्त आयपीएस अधिकारी

मुंबई / नवप्रहार ब्युरो
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला येरवडा तुरुंगात फासावर लटकावण्यात आले होते. येरवडा तुरुंगातील कैद्यांत तुरुंगात कसाबचे भूत असल्याची धास्ती आहे.
मुंबई पोलीस दलातील धाडसी अधिकारी तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पहाटे साडेसात वाजता पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. कसाबला फासावर लटकावण्यासाठी मुंबईहून पुण्याला नेणे आणि तिथे फासावर लटकावणे यासाठी प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. ‘ऑपरेशन X’ असं या मोहिमेला नाव देण्यात आले होते. याच कसाबचे भूत येरवडा तुरुंगात फिरत असल्याची तिथल्या कैद्यांमध्ये दहशत असल्याची माहिती माजी आयपीएस अधिकाऱ्याने दिले आहे.
अटकेनंतर तुरुंगातील अनुभवांवर पुस्तक
रवींद्र पाटील हे माजी आयपीएस अधिकारी असून ते 14 महिने येरवडा तुरुंगात होते. 2004 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या रवींद्र पाटील यांनी 2018 साली सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती, आणि नंतर ते तुरुंगातून सुटून बाहेरही आले. पाटील यांनी तुरुंगातील अनुभवांवर तुरुंगरंग नावाचे एक पुस्तक लिहिले आहे, ज्यात त्यांनी भूतावर एक वेगळं प्रकरण लिहिले आहे. तुरुंगातील अनेक कैद्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याला भूताचे अनुभव सांगितल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
कैदी,बायकोचे भूत आणि चादर
पाटील यांनी एका कैद्याबद्दलचा अनुभव सांगताना म्हटले आहे की एका कैद्याच्या बायकोच्या मृत्यूप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. आपली बायको आपल्यासोबत असून ती आपल्यासोबतच झोपते असं म्हणत तो स्वत:सोबत बायकोसाठीही अंथरुण-पांघरूण घालत असे. यामुळे इतर कैद्यांनाही त्यामुळे बरीच भीती वाटायची. पाटील यांनी म्हटलंय की तुरुंगात अनेक कैद्यांना भुताची भीती वाटायची ज्यामुळे ते रात्री झोपताना हातात हनुमान चालिसा घेऊन झोपायचे. चार कैदी एकच हनुमान चालिसा हातात पकडून झोपायचे.
तुरुंग कर्मचाऱ्याने सांगितला कसाबच्या भूताचा अनुभव
पाटील यांनी म्हटलंय की तुरुंगातील एका कर्मचाऱ्याने त्यांना कसाबचे भूत येरवडा तुरुंगात फिरत असल्याचे सांगितले होते. हे सांगत असताना घाबरून त्याच्या अंगावर शहारे आले होते. या कर्मचाऱ्याप्रमाणेच कैद्यांनाही कसाबचे भूत येरवडा तुरुंगात असल्याबद्दलची भीती वाटत होती. कसाबला कुठे पुरलंय याची कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आपण ती जागा शोधून काढल्याचे रवींद्र पाटील यांनी लगाव बत्ती नावाच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
मुंबईतील विशेष कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती, याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली होती. कसाबतर्फे भारताच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्यात आली होती, जी राष्ट्रपतींनी 5 नोव्हेंबर 2012 रोजी फेटाळली होती. यानंतर 16 दिवसांनी कसाबला फाशी देण्यात आली.
आर्थर रोड तुरुंगातही कसाबच्या भूताची अफवा
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील विशेष कोठडीमध्ये कसाबला ठेवण्यात आले होते. आर्थर रोड तुरुंगातही कसाबचे भूत असल्याचे दावे तिथले कैदी करत असतात. शिवसेना(उबाठा) नेते संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात याबद्दल लिहिले आहे. “कसाबला इथून पुण्याला नेले, तेथेच फासावर लटकवले आणि येरवडा कारागृहात त्याला गाडले. त्यामुळे त्याचे भूत तेथे असायला हवे. पुण्यातून मुंबईला ते भूत रोज कशाला येईल?” असं राऊतांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. यापूर्वी अबू जुंदाल या दहशतवाद्यानेही आपल्याला कसाबचे भूत दिसत असल्याची आणि आपल्याला रात्री झोप येत नसल्याची तक्रार केली होती. कसाब आपल्या स्वप्नात येतो ज्यामुळे मला फार त्रास होतो, मला कोठडी बदलून द्या अशी मागणी जुंदालने त्याच्या वकिलांमार्फत केली होती.