Uncategorized
लॉरेन्स बिश्नोई गँग च्या सदस्याला यवतमाळ येथे अटक

यवतमाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई
यवतमाळ /प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या बिश्नोई गँग च्या सदस्याला यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली आहे. भुपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडाअसे त्याचे नाव आहे. तो जांब रोड परिसरातील दांडेकर लेआऊट येथे एका भाड्याच्या खोलीत वेश बदलवून राहत होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबी ने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवत असताना पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या आदेशाने विशेष पथक कार्यरत होते. यावेळी त्यांना गँगस्टर भुपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा यांच्या बद्दल माहिती मिळाली.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काटेकोर नियोजन करून परिसराचा वेढा घातला. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला झटापटीनंतर ताब्यात घेण्यात आले.
खरी ओळख आणि गुन्हेगारी इतिहास
कठोर चौकशीनंतर आरोपीने आपली ओळख भुपेंद्र सिंग उर्फ भिंडा, वय 35 वर्ष, रा. अहारना खुर्द, जिल्हा होशियारपूर, पंजाब अशी सांगितली. त्याने स्वीकारले की तो कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. आरोपीवर पंजाब. आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. आरोपीवर पंजाब आणि राजस्थानमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म्स अॅक्टसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
विशेष म्हणजे, आरोपी यापूर्वी खूनाच्या गुन्ह्यात 20 वर्ष आणि खूनाच्या प्रयत्नात 10 वर्षांची शिक्षा भोगत होता, मात्र तो फरार झाला होता. फरारीच्या काळात त्याने राजस्थानमधील बाडमेर येथे सुपारी घेऊन हरपालसिंग उर्फ रिंकू याचा खून केला होता.
गँगच्या गुन्हेगारी पद्धतीचा उलगडा
भुपेंद्र सिंगची अटक ही फक्त एका गुन्हेगाराची पकड नसून, एका संपूर्ण गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश करणारी ठरली आहे. या टोळ्या देशभरात सुपारी किलिंग, खंडणी, आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. त्यांना शस्त्रसाठा, वाहने आणि आर्थिक मदत पुरवली जाते. फरारी दरम्यान त्यांना महिन्याला 20 ते 25 हजार रुपये आर्थिक मदत मिळते, जेणेकरून ते पुढील गुन्ह्यांसाठी तयार राहतील.
या तपासादरम्यान हे देखील निष्पन्न झाले की, आरोपीला मागील तीन वर्षांपासून अमेरिकेतून सौरव गुज्जर (बिल्लू गुज्जरचा भाऊ आणि गोल्डी ब्रारचा मित्र) डॉलरमधून पैसे ट्रान्सफर करत होता. त्यामुळे यामागे एक आंतरराष्ट्रीय आर्थिक जाळं असल्याचा संशयही बळावला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, सफौ योगेश गटलेवार, पोहवा विनोद राठोड, पोहवा निलेश राठोड, पोशि आकाश सहारे, मपोना ममता देवतळे यांनी या कारवाईत विशेष भूमिका बजावली.