पेपर फूट प्रकरणातील खरा सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात
महागाव (जि. यवतमाळ)
महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पहिलाच पेपर समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ माजली होती.पण पेपर फूट प्रकरणातील.खरा सूत्रधार शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पुतणीला केंद्रावर सोडायला आलेल्या काकानेच हा पेपर फोडला आहे.
अमोल बळिराम राठोड (२८) असे आरोपीचे नाव आहे. प्रश्नपत्रिका व्हायरल करण्याच्या घटनेत केंद्र संचालकाला नाहक गोवण्यात आल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दहावीची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याच्या प्रकरणाला युटर्न मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
महागावातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठी विषयाचा पेपर अर्धा तासातच समाज माध्यमावर व्हायरल झाल्याची वार्ता काही वेळातच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली, त्यानंतर मोठी खळबळ उडाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर महागाव तालुक्यात दहावीचा मराठी विषयाचा पेपर लिक झाल्याची बातमी झळकली आणि राज्य शासन खडबडून जागे झाले. शिक्षण विभागात या घटनेने भूकंप आला.
प्रशासन खडबडून जागे झाले होते. तहसीलदार अभय म्हस्के, गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस,शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड व पोलिसांचा ताफा कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर धडकला होता. परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर व्हाट्स ॲपवर व्हायरल झाला.
गावातीलच एकाने हा पेपर व्हॉट्स ॲपवर व्हायरल केला होता. त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांनी काल ट्रेस केला होता. आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालकाच्या कार्यालयात पार्टिशन करून तयार केलेल्या खोलीची पाहणी केली असता, व्हाट्स ॲप वर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या फोटोखाली असलेला तळाचा भाग व शाळेतील फ्लोअरचा भाग एकच असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
केंद्र संचालकानेच हा प्रकार केल्याचा संशय बळावल्यानंतर त्यांच्या शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड यांनी महागाव पोलिस स्टेशनला तक्रारही दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी या प्रकरणी कालच गुन्हे सुद्धा दाखल केले होते, परंतु पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून केंद्र संचालकाचा पेपर व्हायरल करण्याच्या प्रकरणात काडीमात्र संबंध नसल्याचे समोर आले आहे.
कॉपी पुरविण्याच्या हेतूने काढला फोटो
केंद्र संचालकाच्या कक्षात जाऊन अमोल बळिराम राठोड (२८) याने सर्वांची नजर चुकवून कार्यालयातील प्रश्नपत्रिकेचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये घेतले आणि ते व्हायरल केले. असे तपासात निष्पन्न झाले आहे. अमोल बळिराम राठोड हा कोठारी येथील रहिवासी आहे. त्याची पुतणी इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे.
तिला सोडायला तो परीक्षा केंद्रावर आला होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने तो सर्वांची नजर चुकवून मुख्याध्यापक तथा केंद्र संचालकाच्या कक्षात घुसला. ऑफिसच्या बाजूला पार्टिशन करून तयार करण्यात आलेल्या खोलीत त्याला चार प्रश्नपत्रिका पडून असल्याचे आढळून आले.
त्याने कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने लगेच आपल्या मोबाईल मध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि त्याचा मित्र गोपाल मधुकर जाधव (२४ ) याच्या मोबाईलवर पाठविला. गोपाल जाधव याने नंतर ती प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर व्हायरल केल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार अमोल बळिराम राठोड यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे १९८२ कलम ५ आणि ६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेपर व्हायरल झाल्याचे कळताच या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी तहसीलदार आणि कस्टोडियन परीक्षा केंद्रावर गेले. शहानिशा करून जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर बोर्डाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
– डॉ. जयश्री राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ