सुनगाव येथील ऐतिहासिक ,प्राचीन पायविहिरीचे संरक्षण होणे आवश्यक!
जळगाव जामोद दिनांक 19.
तालुक्यातील सुनगाव येथे जाणकारांच्या मते यादवकालीन, मौर्यकालीन व शिवकालीन अशा विविध ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व सरकार दरबारी नोंद असलेल्या तीन पायविहिरी असून राज्यभरातील इतिहासाचे अभ्यासक येथे त्यांना भेटी देण्यासाठी येत असतात.
त्यापैकी पहिली विहीर ही सूनगावातील बऱ्हाणपूर वेस जवळील महाराणा प्रतापसिंह गेट जवळ प्राचीन सराई महादेव मंदिर परिसरात अस्तित्वात असून, जुन्या विटा व चुना चे बांधकाम विहीर अष्टकोनी आकारात असून प्राचीन बांधकाम शैलीचा उत्कृष्ट उदाहरण आहे . विहिरीच्या बाजूला घोडे बांधण्यासाठी काही वर्ष आधी छोट्या खोल्या बांधलेल्या होत्या त्या आता नष्ट झाल्या आहेत.ह्या विहिरीवरून गावातील गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोटीद्वारे केलेली असून सर्व हौद आजही ज्याच्या त्या अवस्थेत कायम अंदाजे पन्नास हजार लिटर पाणी साठवून ठेवून आवश्यकतेनुसार गावातील गुरांना छोट्या हौदाद्वारे पिण्यासाठी पुरवण्याची पारंपारिक व्यवस्था या ठिकाणी आजही सुस्थितीत आहे. हे महाराष्ट्रातील दुर्मिळ उदाहरण असून यावर संशोधन व संरक्षण होणे गरजेचे आहे.सध्या ही विहीर सुस्थितीत असून पाण्याचा वापरही सुरू आहे. नुकताच सौंदर्यीकरण साठी निधी आला असून त्यासाठी काही वृक्षांची नुकतीच कटाई करण्यात येऊन परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याचे नियोजन आहे.परंतु येणाऱ्या काळात सौंदर्यीकरण होत असताना या विहिरीचे ऐतिहासिक खरे स्वरूप नष्ट होऊ नये म्हणून यावेळीला कुठेही आधुनिक बांधकाम शैलीचे सिमेंट किंवा वाळू वापरून तिचे खरे स्वरूप विद्रूप करता येणार नाही याची ग्रामपंचायतला, संबंधित सर्व विभागांना खबरदारी घ्यावी लागेल.जशी अचानक वृक्ष गायब झाली तशी अचानक विहिरीला कोणी सिमेंटचे प्लास्टर करून दुरुस्ती करायची असल्यास, पुरातत्त्व विभागाच्या दुरुस्ती पद्धतीच्या धरतीवर चुना ,गुड ,वीट पावडर, हिरमुंजी इत्यादी तांत्रिक गोष्टींचा वापर करून जाणकारांच्या सल्ल्याने दुरुस्ती व्हावी जेणेकरून तिच्या ऐतिहासिक महत्त्व कमी होणार नाही .
व येणाऱ्या काळात सुनगाव हे पर्यटकांच्या व इतिहास अभ्यासकांच्या नकाशावर कायम राहील.
दुसरी पाय विहीर सूनगाव येथेच जामोद वेसे जवळ
मढी महादेव मंदिराच्या परिसरात असून संपूर्ण दगडात आहे.
मंदिर व परिसर विकसित करण्यात येऊन सदर विहिरीला जाळीचे व्यवस्थित कंपाउंड करण्यात आलेले आहे. विहीर सुस्थितीत व संरक्षित आहे.
तिसरी पाय विहीर ही सुनगाव ते जुनापाणी रस्त्यावर एका शेतात आहे.
वीहीर सुस्थितीत असून तिचे पाणी सुद्धा शेतीसाठी वापरल्या जात आहे.
या विहिरीमध्ये ही सिमेंट द्वारे काही दुरुस्ती होऊ नये.
या तिन्ही पाय विहिरी सुनगाव मध्ये राज्यभरातून विविध पर्यटक अभ्यासात खेचून आणून युवकांना रोजगार देऊ शकतात व ग्रामपंचायतला चांगला टॅक्स मिळवून देऊ शकतात.
या दृष्टीने सर्व प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.
सुनगाव ग्रामपंचायत ने तसेच महसूल व तहसील विभागाने या सर्व विहिरींचे महत्त्व लक्षात घेता पुरातत्त्व खात्याकडे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देऊन भविष्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. अशी मागणी इतिहास प्रेमी व सुजान नागरिकांकडून येत आहे.