अत्याचारास विरोध करणाऱ्या गर्भवती महिलेला चालत्या ट्रेन मधून फेकले
महिला गंभीर जखमी ;आरोपी सराईत गुन्हेगार
तामिळनाडू / नवप्रहार डेस्क
अत्याचारास विरोध करणाऱ्या गर्भवती महिलेला धावत्या ट्रेन मधून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे आरोपीला अटक केली आहे. घटना तामिळनाडूतील कटपाडीजवळ घडली. या घटनेने खळबळ माजली आहे. हेमराज असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने अत्याचाराला विरोध केल्याने आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं. दरम्यान, महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर एका महिलेच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील रहिवासी असलेली ३६ वर्षीय पीडित महिला तिच्या आईकडे जात होती. महिला कोईम्बतूर-तिरुपती इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. पीडित महिलेकडे आरक्षित तिकीट नसतानाही ती आरक्षित डब्यात जाऊन बसली होती. यावेळी त्या डब्यात तिच्यासह आणखी सात महिला होत्या. ट्रेन १० वाजून १५ मिनिटांनी जोलारपेट्टई स्थानकात आली तेव्हा इतर सर्व महिला खाली उतरल्या. यामुळे पीडित महिला डब्यात एकटीच होती.
ट्रेन स्थानकावरुन सुटत असतानाच २७ वर्षीय आरोपी हेमराज त्या डब्यात चढला. काही वेळ बसल्यानंतर हेमराज त्या महिलेजवळ गेला आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला आणि स्वत:ला वाचण्यासाठी ती टॉयलेटकडे धाव घेतली. पण आरोपीने तिचा पाठलाग करून तिला ट्रेनमधून ढकलले, ज्यामुळे पीडितेच्या हात आणि पायाला फ्रॅक्चर झाले. घटनास्थळावरून जाणाऱ्या लोकांनी त्याला ट्रेनमधून पडताना पाहिले आणि त्याला वेल्लोरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले.
पीडित महिलेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. तिचे हात-पाय तुटले आहेत. डोक्यालाही जखम आहे. उपचारासाठी तिला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोलारपेट्टई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी हेमराजला अटक केली.
दरम्यान, चेन्नई येथील महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी हेमराजची नुकतीच जामिनावर सुटका करण्यात आल्याचे चौकशीदरम्यान समोर आलं. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०२२ मध्ये गुंडा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.