बेरला नगरीत श्री समर्थ नंदकिशोर महाराजांचा जयघोष
मोर्शी(तालुकाप्रतिनिधी) श्री.समर्थ नंदकिशोर महाराज यांच्या 105 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दि.27 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या न भूतो न भविष्यती शोभायात्रा रॅलीने येरला नगरी दुमदुमली.
या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाचे भक्त साक्षात हनुमानजी अवतरले व ते येरला वासियांसह मोर्शी तालुक्यातील भावीक भक्तांचे विशेष आकर्षण ठरले.यावेळी गावाची लेक समजून सौ.उषाताई विजय सोमवंशी यांचेकडून येरला गावातील महिलांना साडी चोळीचा अहेर प्रदान करण्यात आला.
या ठिकाणी नंदकिशोर महाराजांच्या भव्यदिव्य मंदिराजवळ विविध प्रकारची दुकाने थाटण्यात येऊन लहान मुलांचे झुले,आकाश पाळणे लावण्यात आल्यामुळे येरला गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी 15000 भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मोर्शीला लागूनच असलेल्या येरला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री.समर्थ नंदकिशोर महाराज यांच्या 105 व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने 20 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत ह.भ.प.पंकज महाराज पोहोकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथेनंतर आज दि.27 जानेवारी रोजी
ह.भ.प.पंकज महाराज पोहोकार यांच्या सुमधुर वाणीतून काल्याच्या किर्तनाने अक्षरशः भाविक भक्तगण भारावून गेले होते. सकाळी 9 वाजता नंदकिशोर महाराज मंदिर येथून वाजत गाजत भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली.येरला गावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रा रॅली मार्गावर पाणी सडा व रांगोळ्या टाकून संपूर्ण गाव सुशोभित करण्यात येऊन घराघरासमोर नंदकिशोर महाराजांचे फोटो लावण्यात आले होते.त्यामुळे या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या शोभायात्रेत नंदकिशोर महाराजांच्या पालखीसह गावागावातील पालख्या, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ,महिलांचे भजनी मंडळ,लहान मुलींचे लेझीम नृत्य यांचा सहभाग होता. शोभा यात्रेदरम्यान साऊंड सिस्टिमच्या गजरात अकोट येथील देवेंद्र थोरात साक्षात (बजरंगबली) व त्यांचे भक्त आकाश बेराळ हे हातात गदा घेऊन व गावातील युवक प्रभू चरणी तल्लीन होऊन नाचत गाजत होते. शोभायात्रा रॅली येरला गावाच्या कानाकोपऱ्यातून काढण्यात येऊन शेवटी रॅलीचा समारोप नंदकिशोर महाराजांच्या मंदिरात करण्यात आला.यावेळी ह.भ.प. गजानन महाराज कपिले हिंगणघाट,ह.भ.प. पंकज महाराज राठोड,ह.भ.प.शिवा महाराज बावस्कर जळगाव,ह.भ.प.रमेश दुधे महाराज यवतमाळ, ह.भ.प.अजय महाराज बोबडे नागपूर,ह.भ.प. लक्ष्मणराव काळे महाराज अमरावती यांच्या उपस्थितीमुळे येरला गावाला संताच्या नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.शोभायात्रा रॅली दरम्यान जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. गावातील नंदकिशोर महाराजांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.