साहित्यिकांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपल्या लेखण्या परजाव्यात – प्रा.संजय घरडे
ज्ञान ज्योत फाउंडेशन आणि संत गाडगे महाराज विचार मंचातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि प्रकाशन समारंभाचे आयोजन
पुणे दि. (प्रतिनिधी) : साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असते. त्याचे स्वरूप कथा, कादंबरी, कविता, गझल काहीही असले तरी समाजाचे दिशा दिग्दर्शन करणे हाच त्याचा प्रमुख हेतू आणि उद्देश असला पाहिजे. मराठी कवितेचा महादंबेने केलेला उदय हाच मुळात परिवर्तनाचा विचार पुढे आणणारा आहे. त्यानंतरच्या काळात सुफी संतांनी निर्मिलेले साहित्य हे सुद्धा तत्कालीन समाज जीवनाला प्रबोधना करिताच रचलेले आहे. मध्यंतरी पान-फुल, निसर्ग आणि लौकिक अर्थाने प्रेमाचा शिरकाव साहित्यात झाला. खऱ्या अर्थाने सुफी संतांनी आपल्या साहित्यात वापरलेली प्रतीके आणि प्रतिमांचा पाहिजेत तसा आणि तेवढा अभ्यास कदाचित होऊ शकला नाही. म्हणूनच सुफी- संतांच्या साहित्याला धार्मिक आणि प्रेमाचा रंग चढविण्यात आला असावा. मात्र हे साहित्य समाज परिवर्तनाचे साहित्य होते आणि आहे. हाच साहित्याचा विचार आणि आशय लक्षात घेऊन नवसहितकांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपल्या लेखण्या परजाव्यात असे आवाहन प्रा. संजय घरडे यांनी केले. ते, ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मांजरी, हडपसर पुणे आणि संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य ओतुर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे. येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 आणि सुभाताई लोंढे यांच्या दीपस्तंभ कविता संग्रह आणि जिगरबाज या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दंगलकार नितीन चंदनशिवे तर प्रमुख अतिथी म्हणून मोहिनी कारंडे, बी एस वडेकर, संदीप सातपुते, बाबासाहेब जाधव, राजेश साबळे ओतुरकर, डॉ. प्रीती मोरे, हनुमंत क्षिरसागर, रघुनाथदादा कांबळे,सूत्रसंचालक संजय गवांदे, ज्ञान ज्योत फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता काळे, संत गाडगे महाराज विचार मंचाचे संस्थापक कार्याध्यक्ष रणजीत पवार, ज्ञानज्योत फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष कांचन मून आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. संजय घरडे म्हणाले की, वर्तमान काळात मुक्तछंदातील कविता ही सवंग होत चालली असून मुक्तछंद हा छंद आहे हेच काही कवी विसरत चालले आहेत. मुक्तछंदातील कवितेत सुद्धा एक आंतरिक लय असते, याचे भानच काही कवींना राहिलेले नाही. हे सांगतानाच मुक्तछंदातील अनेक गीते त्यांनी उपस्थितांना म्हणून दाखविलीत. आज मराठीत गझलेला भरपूर पीक आलं असून ती इश्काच्या कैफात स्थिरावण्यापेक्षा तिच्या परिवर्तनाच्या मूळ दिशेकडे ती वळली पाहिजे. ज्या साहित्यिकांना पुरस्कार मिळतात त्याचा सन्मान वाढतोच पण त्या साहित्यिकाची जबाबदारी अनेक टक्क्यांनी वाढली असते. मात्र सध्या अनेक संस्था पैसे घेऊन पुरस्कार देतात काही संस्था तर ऑनलाइन पुरस्कार घरी पाठविण्यातही तरबेज आहेत. मात्र ज्ञानज्योत फाउंडेशन आणि संत गाडगे महाराज विचार मंचाने आजवर ज्या साहित्यिकांना आणि ज्या साहित्यकृतीला पुरस्कार दिलेले आहेत ते त्यांचा दर्जा तपासून दिलेले आहेत हे पुरस्कार निवडताना तावूनसुलाखून आणि प्रामाणिकपणे दिलेले आहेत. त्यातला एकही पुरस्कार हा पैसे घेऊन देण्यात आला नाही. प्रसंगी पदरमोड करून या संस्था हे कार्य करीत आहेत. त्यांचे कौतुक आणि त्यांना सहकार्य साहित्य प्रांताने केलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी दोन्ही मंचाच्या वतीने ,बुद्धवासी श्रीराम पुंजाजी भरणे यांचे स्मरणार्थ,काही पुरस्कार समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.त्यामध्ये प्रा.नागेश हुलवळे,डोंबिवली यांना ज्ञानज्योत राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार,अक्षय भोईटे,पुणे यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार,किशोर इंगोले यवतमाळ यांना राज्यस्तरीय वृक्षमित्र व कलागौरव पुरस्कार ,उमा लुकडे यांना साहित्यसेवा पुरस्कार,सुजाता व गोविंद नाणेकर यांना वृक्षमित्र व पर्यावरण रक्षक पुरस्कार यांना प्रदान करण्यात आले.
त्यानंतर बुद्धवासी कान्होबा चिंधुजी मून यांचे स्मरणार्थ, धम्मचक्र प्रवर्तनदिन ऑनलाईन व्हिडीओ काव्यस्पर्धा विजेते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर काव्यरत्न पुरस्कार प्रथम – रुपाली राऊत बोईसर , द्वितीय – सविता धामगये नागपूर, तृतीय- प्रियंका बेंद्रे चंद्रपूर,व उत्तेजनार्थ- मनोज गायकवाड ठाणे यांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर नवरात्री निमित्त रणरागिनींची ऑनलाईन काव्य सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना संत गाडगे महाराज काव्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यामध्ये प्रथम -कविता खैरणार बाविस्कर धुळे, द्वितीय -कु.श्रुती दळवी डहाणू, तृतीय -साधना शेळके पुणे आणि उत्तेजनार्थ वत्सलाबाई पवार पाटील परभणी. यावेळी संत गाडगे महाराज विचारमंचाच्या कार्यकरिणीचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन सात मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.त्यामध्ये राजेश साबळे सल्लागार,डॉ.खं. र.माळवे अध्यक्ष, संजय गवांदे उपाध्यक्ष,कविता काळे सचिव, कांचन मून सहसचिव, रेखा फाले संघटक, सौरभ नवले सहसंघटक,नागेश हुलवळे यांची प्रसिद्धी प्रमुख पुढील तीन वर्षासाठी निवड केली आहे.असे संस्थापक रणजित पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधान प्रास्ताविकेचे वाचन कु.ज्योत्स्ना काळे यांचे सह उपस्थितांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन मून यांनी केले, तर कविता काळे यांनी पुरस्कार आणि पारितोषिके देण्यामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गवांदे यांनी केले तर रणजित पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला राज्यातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….