राजकिय

शिंदे यांनी का ताणून घेतले ? त्यांना नेमका संदेश काय द्यायचा होता ? 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क

 देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतायेत, याची जशी देशभरात चर्चा आहे, तशीच चर्चा एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होणार का? याचीही होती.

                महायुतीला बहुमत मिळाल्या नंतर देखील सत्ता स्थापनेला उशीर झाला असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मुख्य म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या भूमिकेमुळे सत्ता स्थापनेला उशीर होत होता. कारण अजित पवार यांनी पूर्वीच फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला समर्थन दिले होते. पण शपथ विधीच्या 3 तासापूर्वी पर्यंत देखील शिंदे यांच्या कडून होकार आला नव्हता. त्यामुळे शिंदे कुठल्या कारणाने ताणून घेत होते. यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते . शिंदे यांना महत्वाची खाती आपल्याकडे यावी असे वाटत असल्याने ते ताणून घेत होते. असे देखील म्हटल्या जात आहे.

 एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत देखील अस्वस्थता पसरली होती. मंत्रिपदासाछी इच्छुक नेत्यांची धाकधूक वाढत होती, भाजप नेतेही टेन्शनमध्ये आले होते. अखेर संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेअंती शिंदे यांनी उपमुख्यमंत्राची शपथ घेण्यास होकार कळवला.

अडीच वर्षे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांच्या उत्तम साथीने सरकार चालवले, मग फडणवीस यांच्यासोबत शपथ घ्यायला शिंदे का तयार नव्हते? एकनाथ शिंदे यांनी अखेरपर्यंत का ताणून धरले होते? त्यांना भारतीय जनता पक्षाला काय संदेश द्यायचा होता, असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी अखेरपर्यंत का ताणले?

एकनाथ शिंदे यांनी गृह, नगरविकास, महसूल आदी महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. परंतु राज्य भाजप नेतृत्वाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. नवी दिल्लीत खातेवाटपावर चर्चा झाली नसल्याने वरिष्ठ पातळीवर आपल्या मागण्या कशा मांडायच्या? हा शिंदे यांच्यासमोरील मोठा प्रश्न होता. फडणवीस यांच्याशीच चर्चा करून अंतिम तोडगा काढावा लागणार होता. त्यासाठी आपल्या मागण्या कळवून शिंदे यांनी काहीशी ताठर भूमिका घेतली. भाजप नेते समजूत काढतील, अशी आशा त्यांना होती. परंतु भाजपनेही सावधानतेने पावले टाकून शिंदे यांच्या खेळीला उत्तर दिले. त्यानंतर शिंदे यांनी दुसरी चाल खेळली. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याचा सस्पेन्स त्यांनी अखेपर्यंत ठेवल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थथा पसरली.

एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली की सत्तावाटापाच्या वाटाघाटीतील ताकद (बार्गेनिंग पॉवर) संपून जाईल आणि मग मिळतील त्या खात्याचा कार्यभर स्वीकारावा लागेल, याची पूरेपूर जाण एकनाथ शिंदे यांना आहे. त्याचमुळे आपल्या ‘बार्गेनिंग पॉवर’चा यथायोग्य वापर करण्याचे शिंदे यांनी मनाशी ठरवले. त्यानुसार महत्त्वाची खाती मिळविण्यासाठी त्यांनी भाजपवर अखेरपर्यंत दबाव टाकला.

तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सहकाऱ्यांचा देखील चांगल्या खात्यांसाठी दबाव होता. आपण भाजपशी चर्चा करताना नरमाईची भूमिका घेऊ नये. आपलीही संख्या जवळपास ६० आहे. त्यामुळे आपल्याला साजेशी खाती मागण्यात कोणताही कमीपणा नाही, अशी भूमिका शिवसेना आमदार मांडत होते. त्यामुळे शिंदे यांच्यासमोर स्वत:साठी गृहखाते मिळवून वरिष्ठ सहकाऱ्यांसाठी देखील चांगली खाते पदरात पाडून घेणे हा महत्त्वाचा आणि मोठा टास्क होता. त्यामुळे शिंदे यांनी अखेरपर्यंत ताठर भूमिका घेऊन भाजपला दबावतंत्राच्या माध्यमातून द्यायचा तो संदेश दिला. त्यामुळे अंतिम निर्णयाप्रत यायला त्यांना वेळ लागला. अगदी शपथविधीला ३ तास बाकी राहिलेले असताना त्यांनी शपथ घेणार असल्याचे राजभवनाला कळविले.

हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेला गृहखाते देण्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती आहे. मात्र गृहखात्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी याच विषयावर एकनाथ शिंदे यांच्याशी पाऊणतास चर्चा केली. ⁠गृहखात्यासोबतच महसूल खाते, नगरविकास खाते आणि MSRDC खात्यांसाठी शिवसेना आग्रही आहे. भाजपच्या सकारात्मक प्रतिसादानंतरच शिंदे सरकारमध्ये सामिल होण्यास राजी झाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close