पहा कोणाचे सरकार ? मागच्या वेळी खऱ्या ठरलेल्या एक्झिस्ट पोल चा आला अंदाज
मुंबई / नवप्रहार डेस्क
20 नोव्हेंबर ला निवडणूक आटोपताच जवळपास 7 ते 8 एक्झिस्ट पोल ने राज्यात महाविकास आघाडी की महायुती या बाबत आपला अंदाज वर्तविला आहे. पण मागच्या वेळी ज्या एक्झिस्ट पोल चा अंदाज अचूक ठरला होता. त्या अॅक्सिस माय इंडिया चा एक्झिस्ट पोल आला आहे. चला तर पाहू या काय म्हणणे आहे या एक्झिस्ट पोल चे गेल्या वेळच्या निवडणुकीत सात एक्झिट पोल आले होते. त्यापैकी एकमेव एक्झिट पोल खरा ठरला होता. त्या अॅक्सिस माय इंडियाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. मतदान संपताच सुमारे १०-१२ कंपन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले होते.
परंतू, अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला नव्हता. यामध्ये काय अंदाज लावण्यात आले आहेत, चला पाहुया…
मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीच्या पारड्यात २२ जागा तर महाविकास आघाडीच्या पारड्यात १४ जागा जाताना दाखविण्यात आल्या आहेत. महायुतीला ४५ टक्के तर मविआला ४३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज देण्यात आला आहे. वंचितला २ टक्के मतदान आणि मनसेसह अन्य पक्षांना १० टक्के मतदान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे मनसेला एकही जागा मुंबईत जिंकताना दाखविण्यात आलेले नाही.
कोकण आणि ठाणे पट्टयातील ३९ जागांपैकी महायुतीला २४ तर मविआला १३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना २ जागा दाखविण्यात आल्या आहेत. इथे मविआला मोठा धक्का बसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा गड आहे. तिथे महायुतीला ५० टक्के आणि मविआला ३३ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर मनसेसह इतरांना १५ टक्के मतदान दिसत आहे.
मराठवाडा भागात ४६ पैकी महायुतीला ३०, मविआला १५ आणि इतर १ अशा जागा मिळतानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मतांच्या टक्केवारीत महायुतीला ४५, मविआला ३८, वंचितला ५ आणि इतरांना १२ टक्के मतदान होताना दिसत आहे.
उत्तर महाराष्ट्रात ४७ जागांपैकी महायुतीला ३८, मविआला ७ आणि इतरांना २ जागा मिळताना दिसत आहेत. मतांच्या टक्केवारीत महायुती ५३ टक्के, मविआ ३२ टक्के, वंचित २ आणि इतरांना १३ टक्के मतदान झालेले दिसत आहे.
शरद पवारांचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात देखील मविआ पिछाडीवर आहे. महायुतीला ३६, मविआला २१, इतर १ अशा जागा मिळताना दिसत आहेत. तर मतांच्या टक्केवारीत महायुती ४८, मविआ ४१ आणि इतरांना ११ टक्के मतदान होताना दिसत आहे.
एकंदरीतच महायुतीला मोठ्या मतांच्या फरकाने १५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मविआला ७० जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. अॅक्सिस माय इंडियाने विदर्भातील ६२ जागांचा एक्झिट पोल अद्याप जाहीर केलेला नाही. परंतू, या २२६ जागांवर महायुती मविआला क्लिन स्विप देत असल्याचे चित्र आहे. लाडकी बहीण योजना मविआची मते फोडण्यात कमालीची यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. महायुती आणि मविआतील मतांचे अंतर हे ४८-३७ टक्के एवढे कमालीचे वाढले आहे. जवळपास ११ टक्क्यांचा हा फरक दिसत आहे.