तेव्हा कृष्णकुंज च्या बाहेर का निघाला नाहीत – सुषमा अंधारे
माहिम। / विशेष प्रतिनिधी
महिम येथे झालेल्या सभेत शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेत ते त्यांच्यावर कडाडल्या. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत जेव्हा पोलिसांवर अत्याचार होत होते तेव्हा तुम्ही कृष्णकुंज बाहेर का पडले नाहीत असा खडा सवाल केला. राज ठाकरे यांनी मी पोलिसांच्या बाजूने उभा आहे असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
‘जर कायद्याचे राज्य स्थापित करायचे असेल तर ही निवडणूक महत्वाची आहे. पक्षप्रमुखांच्या काळात एकही धार्मिक दंगल उसळली नाही. अनेकांनी तसे प्रयत्न केले. उद्धव ठाकरे इतक्या आपुलकीने सांगायचे की ते कुटुंबातले व्यक्ती वाटायचे. मराठा आरक्षणासाठी जेव्हा मराठा बांधव एकत्र आला तेव्हा त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश याच गद्दार गँगने दिले. कोकणात बारसूच्या आंदोलकांवरही लाठीहल्ला झाला. देहु आळंदीत वारकऱ्यांवर हल्ला करणारेही हेच ते लोक. बदलापूरमध्ये बोलायचं सोडून लाठीहल्ला करण्याचा निर्घृण प्रकार केला. हे आंदोलन चिघळवतात, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
राणे पिता- पुत्रांवर टीका..
“१० वर्षांपर्यंत खून झाला तर कुठेतरी निर्जनस्थळी व्हायचे. गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांचा धाक राहिला नाही. इथ फेसबुक लाईव्ह करुन माणसं मारली जातात. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर गोळीबार केला जातो. इथला उमेदवार तर इथला भारी आहे. गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार करतो, पोलीस म्हणतात आम्ही अभ्यास करतोय. कारण गृहमंत्र्यांनी गुंडाचा पालक होणे जास्त पसंद केले. कोकणातून आलेले चाराणे- बाराणे बोलत राहतात. मातोश्रीवर भुंकतात. आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. नारायण राणेंनी पत्ता बदलला का? बापाचा पत्ता बदलणारी माणसं काय बोलायचं या माणसांवर,” असे म्हणत त्यांनी राणे पिता पुत्रांवरही तोफ डागली.
राज ठाकरेंवर निशाणा
“इथ अजून एक उमेदवार आहेत. जे राजपुत्र आहेत. त्या राजपुत्रासाठी स्थान असलं नसलं तरी नावात राज असलेली माणसं सभा घेत आहेत. ते सभा घेणारे म्हणाले, मी पोलिसांसाठी उभा राहणार आहे. मगं जेव्हा पोलिसांचा अपमान होत होता, पोलीस पत्नींचा अपमान होत होता. तेव्हा कृष्णकुंजच्या बाहेर का निघाला नाही. का बोलला नाही. सदा सरवणकरने हवेत गोळीबार केला, तेव्हा कृष्णकुंजवाल्यांना का आठवला नाही. तेव्हा तुम्ही तत्परता दाखवली असती तर आज तो फॉर्म भरायला राहिला नसता. हे तुम्ही केलेलं पाप आहे. तुम्हाला पहाटेचा शपथविधी खटकला तर, हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला. पहाटे पहाटे किसिंग, किसिंग करत होता, त्याच्यावर बोलायचं सुचत नाही का? अजित पवारांवर बोलता मग देवेंद्र फडणवीसांवर मेहेरबानी कशासाठी ? ईडीची नोटीस वाचवण्यासाठी आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.