छत्रपती समोर शपथ घेऊन शब्द फिरवला , भास्कर जाधव संतापले
प्रतिनिधी / नागपूर
निवडणुकीच्या प्रचाराने वेग पकडला आहे. प्रत्येक पक्षातील नेत्याच्या सभेचा माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडवल्या जात आहे. दरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते (UBT) भास्कर जाधव काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी छत्रपतींसमोर शपथ घेत शब्द फिरवल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एक नवा वाद उफाळण्याचे संकेत मिळत आहेत.
रामटेकमध्ये काँग्रेसकडून झालेल्या बंडखोरीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेते सुनिल केदार यांना सुनावलं आहे.
कळमेश्वरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुनिल केदार यांनी शिवछत्रपतींच्यासमोर घेतलेली शपथ अवघ्या 15 दिवसांमध्ये विसरले, पण अशा लोकांना जनता माफ करणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे रामटेकचे उमेदवार विशाल बरबटे यांच्या प्रचारसभेत भास्कर जाधव बोलत होते.
रामटेकमध्ये काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीमागे सुनिल केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाकडून केला जात आहे. पाच महिन्यांपूर्वी खासदारकी निवडून आणण्यामागे शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं. तुम्ही शब्द फिरवला, तुम्ही माणसं आहात की जनावरं? अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सुनिल केदार यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे.
‘रामटेकमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली, याची मला वेदना होतेय. काँग्रेसची नैतिक जबाबदारी आहे, त्यांनी राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई करायला हवी. मुळक यांच्या बंडखोरीमागे इथल्या काँग्रेस नेत्याचा हात आहे’, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
‘पूर्व विदर्भात फक्त एक जागा आम्हाला मिळाली. त्यातील जागेवर काँग्रेसने बंडखोरी केली आहे. आजपर्यंत बंडखोर जिल्हाध्यक्षावर काँग्रेसने कारवाई केली नाही, हे वेदनादाई आहे. रामटेक लोकसभा आम्ही काँग्रेसला दिली, पण त्याचं फळ आमच्या पदरात हे पडणार असेल तर हे वेदनादायक आहे. यामुळे तरुण कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. बंडखोरीचा विषय आमच्या पक्षाने गांभीर्याने घ्यावा’, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
‘आघाडीमध्ये असं वर्तन योग्य नाही. काँग्रेसकडून अशाप्रकारचं वर्तन नेहमी होतंय. आमचा उमेदवार निवडून येईल, पण मित्रपक्षाने अशी दगाबाजी योग्य नाही’, असं म्हणत भास्कर जाधव यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.