पुणे / नवप्रहार डेस्क
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा धुरळा उडत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी आप आपला वचननामा जनतेसमोर आणला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापरातील जाहीर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हिंमत असेल तर मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधून दाखवा असं आव्हान केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारले. मात्र आता यालाच छत्रपती संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्यास आमचा विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधल्यास आम्ही खपवूण घेणार नसल्याचे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी वक्तव्य केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या वक्तव्याने राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणे म्हणजे रयतेच्या राजाचे दैवतीकरण करण्यासारखे आहे. एवढ्यावरच ते न थांबता ते म्हणाले की, येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांना चार हात लावले जातील, यामुळे इतिहासात याबाबतीत झालेला चमत्कार खोटा असल्याचा सांगितला जाईल, असा दावा संतोष शिंदे यांनी केला आहे.
तुम्हाला त्यांचे दैवतीकरण करायचे असेल तर करा, तुम्हाला त्यांचे ब्राह्मणीकरण करायचे असेल तर करा, मात्र मंदिर स्थापन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा कायम विरोध असेल. त्यानंतर ते म्हणाले की, मंदिर बांधल्याने एका माणसाची रोजगार हमी होईल. मात्र आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे घरोघरी हवेत, यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे, असे संतोष शिंदे म्हणाले आहेत.