जागर फाऊंडेशन कडुन 111 गरजु मूलीना सायकल भेट
निराधारांचा आधार,हाच जागर चा निर्धार
बाळासाहेब नेरकर कडुन
अकोल्याचा प्रमिलाताई ओक हॉल….. त्या हॉलमध्ये व्यासपीठावर समाजवादी संत गाडगेबाबांची मूर्ती आणि मूर्तीच्या एका पायाजवळ पणती तेवत असते. अंधारात दिवा तेवत असतो. गौरव करा किंवा करू नका… दिवा तेवतच असतो कारण दिव्याने तेवायचेच असते! असा स्पष्ट संदेश संपूर्ण सभागृहात व सभागृहाबाहेर पसरलेल्या समाजात जातांना दिसत होता. जागर फाउंडेशनचा निराधारांची दिवाळी उपक्रम हे निमित्त होतं. ७.८३ टन रद्दीचे संकलन आणि त्यातून जमा झालेला ८.८३ लाखाचा निधी विश्वास आणि सचोटीचे प्रतीकच जणू ! आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या व घरापासून शाळेत किमान ३ कि.मी. पायी जाणाऱ्या १११ गरीब मुलींना नवीन सायकलींचे वितरण सोहळा म्हणजे नकाराच्या वाळवंटात प्राणपणाने फुंकर मारून ‘शिक्षणानंदाचे झरे’ निर्माण करण्याचं असिधारा व्रतच ज्यांनी घेतलंय, त्यांच्या दोन महिन्यांच्या परिश्रमाचा सच्चा सोहळा होता. हे जागर फाउंडेशन म्हणजे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारसरणीवर जगणाऱ्या समूहाचे संघटन आहे. या समूहाच्या संघटनेत कोणी अध्यक्ष नाही किंवा कोणी पदाधिकारी नाही, केवळ एकच ब्रीद आहे, ‘ जागर संवेदनांचा, जागर जाणिवांचा’! ‘ ‘जीवन’ याचाच अर्थ गती ! गतिमान जगणाऱ्यांच्या जगण्यातही एक प्रकारची वीज असते. तुम्ही वेगात असला म्हणजे व्यर्थ माणसं तुम्हाला भेटणारच नाहीत. ते पण ओळखतात. ‘टाइमपास’ साठी हा माणूस परवडायचा नाही रे बाबा! हे पाणीच वेगळं आहे! मग आपोआप माणसांशी गतिमान माणसांशी गतिमान माणसांचेच सूर जमतात. ‘ ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ तयार होऊ लागते. हे तयार होणं १३ वर्षांपासून जागर फाउंडेशन अव्याहतपणे करते
आहे. सतत वर्धिष्णु व्हायची धडपड असते यांची !! ऐन दिवाळीच्या पाडव्याचा दिवस… मात्र ‘माणुसकीची ज्योत’ पेटलेली पाहायची असेल इथे दिसते. माजी अभ्यासू शिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे यांच्या ‘सावित्रीचं वाण’ कवितेतल्या
ओळी इथे आपुलकीने भेटतात…..
“ज्योत म्हणाली वातीला
चल माझ्या साथीला…
सावित्रीचं वाण घेऊ,
अक्षराचं दान देऊ…,”
” पुस्तकाअभावी किंवा पुस्तकांच्या वाचनाअभावी माणसं रद्दी होतात’ असं एक वाक्य नेहमी वाचण्यात येतं मात्र इथे ‘जागर’ ने रद्दीच्या संकलनातून पुस्तकाकडे नेणारी वाट या सायकलींच्या मदतीतून मुलींसाठी सुकर केली आहे. ‘जागर’ मधली माणसं खूप गडगंज संपत्तीची नाहीत पण माणुसकीची गडगंज संपत्ती इथे भरपूर प्रमाणात दिसते. सामान्य समजल्या जाणाऱ्या माणसांतच खूप वेगळं जगणारी स्फूर्तिदायी माणसं आहेत ही! जगण्यावरचा विश्वास वाढावा अशी प्रकाशाची सुंदर बेटं आपल्याव भोवती असतात; पण आपण खिडकी उघडायला तयार नसतो. काळोख आणि उजेड यांच्यामध्ये फक्त एक दरवाजा असतो म्हणूनच या दरवाजाकडे नेण्यासाठी हा ‘भावसंवाद’ पुढे सरसावतो.
‘जागर ‘च्या या कार्यक्रमाला अमरावतीचे ज्येष्ठ समाजसेवी ‘प्रयास- सेवांकुर’ चे सर्वेसर्वा डॉ. अविनाश सावजी हे होते. ‘ का जगायचे कळले तर कसे जगायचे हा प्रश्नच उरत नाही व का जगायचे हे कळले नाही तर कसे जगायचे यातच आपण आयुष्यभर भरकटत राहतो ‘या विचाराला अनुसरून कृतीतून विचार यांनी अगदी विचार वर्तनातील स्पष्टतेला धरून मांडले. “वर्तनात शहाणपण असावं ” हे व्यक्त करून खास ‘जागर’ साठी ते अकोल्यात आले,
कारणही सांगितलं की ‘जागर’ च्या वर्तनात शहाणपणं आहे! पुढे विचार मांडताना ते बोलले की, “परीसाचा स्पर्श असणारी माणसं शोधता आली पाहिजे”, त्यांचं हे अर्थपूर्णता असलेलं वाक्य खासच भावलं….
सर्वांना! ‘मुझे पढ़ने दो, मुझे उडने दो’ या ‘जागर’ च्या खासियतसाठी त्यांची अस्सल कौतुकाची थाप उर्जा देणारी आहे ‘ निराधारांचा आधार, हाच ‘जागर’ चा निर्धार’ उठून झळाळतो कारण माणसांच्या अपार वेदनांचे ज्ञान व आकलनाचा प्रकाश या माणसांमध्ये (जागरच्या) आतमध्ये खोलवर पडलेला आहे. या प्रकाशामुळेच ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान…’ ही यांची वाटचाल दिसतेय. या सायकल वितरण सोहळ्यात सोनाळा हिवरखेड रोडवरील कारला फाटा जवळ इयत्ता सातवीमध्ये शिकणारी रेशमा आपल्या परिवारासोबत एका शेतात राहते. जागर फाउंडेशन तिच्यापर्यंत पोहोचलं कसं? तर जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, हिवरखेडचे मुख्याध्यापक व समाजसेवी ‘माणूस’ नीलेश खिरोडकार यांच्या माध्यमातून त्यांना रेशमा पर्यंत पोहोचता आलं. आलं. आता आयुष्यात पहिल्यांदा ती सायकल चालविणार आहे, ज्ञानार्जनासाठी शाळेपर्यंत पोहोचणार आहे. अत्यंत कष्टमय जीवन जगणारा तिचा परिवार, ज्यांना स्वतःचं घरही नाही, निवारा नाही, त्या घरातल्या मुलीला समाजाने दिलेल्या रद्दीच्या योगदानातून सायकलची दिवाळी भेट ‘जागर’ ला देता आली. इथे ‘माणुसकीचा जयजयकार’ ऐकू आला. अशा माणुसकीचा प्रकाश अन् ज्ञानाचा प्रकाश पडला आणि तो कृतीत आला तेव्हा आनंदाची संकल्पना उन्नत होताना दिसते. ‘जागर फाउंडेशनच्या ‘सामाजिक भानाच्या ‘ दिवाळीला अध्यक्ष लाभलेले शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन नारे यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती म्हणजे, ” बाहेरचा प्रकाश आत झिरपतो आहे ना आणि आनंद वरची पायरी गाठतो आहे ना, हे प्रश्न सर्वांना पडोत आणि तमाचे सारेच तळ दिव्यांनी उजळून निघोत!” हे त्यांचं वाक्य खरं ठरणारा हा ‘जागर उत्सव’ म्हणूनच या दिवाळीत मोलाचा ठरला.
– प्रा.डॉ. सुहास उगले, अकोला