एक तर तू तरी राहशील किंवा मी यावरून ते आमचे दुश्मन नाही वाचा कोण म्हणले असे
मुंबई / नवप्रहार डेस्क
राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू अथवा मित्र नसतो असे म्हटल्या जाते. याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. पण यावेळी जे घडले ते कशाचे इंगित आहे यावरून राज्याचे राजकारण तापले आहे.
कुठे नाराजी, कुठे बंडखोरी कुठे मतभेद हे सगळं समोर येत आहे. या दरम्यान संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच अमित ठाकरेंबाबतही भाष्य केलं आहे.
अमित ठाकरे आणि राज ठाकरेंबाबत काय म्हणाले संजय राऊत?
माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी माघार घेतली तर ठाकरे गट आपला उमेदवार मागे घेणार का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, माहीममध्ये आमचा उमेदवार मागे घ्यायला तिकडे पंडित नेहरु उभे आहेत का? इंदिरा गांधी किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत? ज्यांच्यासाठी उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घ्यावा. तरुण मुलांना राजकारणात लढू द्या. त्यांना राजकारण घासूनपुसून कळू द्या. त्यांना समजू द्या राजकारणात काय त्रास आहे तो. तरंच त्यांचं नेतृत्व उभं राहील. आम्ही काय राजकारणात सहजपणे इथपर्यंत आलो आहोत का? असं संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन’, हे वक्तव्य केवळ राजकारणापुरतं मर्यादित होतं, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे”, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरु असल्याची शक्यताही फेटाळून लावली. एबीपी माझा या वाहिनीला संजय राऊत यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं.
संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे, आमचा पक्ष फोडला आहे, ते अनाजीपंत आहेत वगैरे वगैरे अनेक उपमा देऊन कायमच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. मात्र आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुश्मनी नाही असं म्हटल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का? असं विचारलं असता आमची इच्छा हीच आहे की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या काळात चांगलं काम केलं आहे. तसंच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल हे मी सांगतो आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही शिवसेनेतल्या आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.