एकाने त्रिवेणी तलावात उडी घेऊन तर दुसऱ्याने शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या!
मोर्शी(तालुकाप्रतिनिधी) तालुक्यातील अंबाडा येथे एका 40 वर्षीय युवकाने तलावात उडी घेऊन तर धानोरा येथील एका 37 वर्षीय युवकाने आपल्या स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दि.16 ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली. नितीन उत्तमराव गणेश वय 40 रा.अंबाडा तर बस्तीराम पंधरे वय 37 रा.धानोरा असे मृतकाच नाव आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाडा येथील नितीन उत्तमराव गणेशे याची पत्नी व दोन वर्षाची मुलगी काही महिन्यापासून माहेरी राहत असल्याच्या विवंचनेत नितीन राहत होता. दरम्यान त्याने दि.16 ऑक्टोंबर रोजी त्रिवेणी तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस पाटील सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही माहिती दूरध्वनीवरून मोर्शी पोलिसांना देण्यात आली.मोर्शी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतक नितीनचे प्रेत तलावातील पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येथे रवाना करण्यात आले. दुसऱ्या अन्य घटनेत धानोरा येथील
बस्तीराम पंधरे वय 37 वर्ष यांनी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक बस्तीराम पंधरे याचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रवाना केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास आरंभीला आहे.