कसबेगव्हाण येथील पुनर्वसित पाचशे ग्रामस्थांच्या जीवनात उजाडली नवी पहाट..!
अखेर ९४ पुनर्वसित कुटुंबांचा १७ वर्षाचा वनवास संपला.*
एक कोटीच्या निधीतून होतील मुलभूत विकासकामे*
*आमदार बच्चु कडू व सरपंच शशिकांत मंगळे ठरले देवदूत*
कसबेगव्हाण येथील भुलेश्वरी नदीला २००७ साली आलेल्या महापुराने ११५ घरांची माती झाली ..प्रशासनाने २०१३ साली ९४ कुटुंबियांचे गावाजवळच अडीच एकर शेतजमिनीवर पुनर्वसन केले..पुनर्वसन करताना त्या ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरविण्याच्या जबाबदारीचा मात्र प्रशासनाला विसर पडला होता.आजही दहा वर्षानंतर पुनर्वसित पाचशे ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत होते. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत …विद्युत व पाणी वगळता इतर कुठल्याही मुलभूत सुविधा या ग्रामस्थांना अद्यापही उपलब्ध नव्हत्या …रस्ते ,नाल्या कश्याचीही सुविधा या ठिकाणी नव्हती …पुनर्वसन करतांना बाधित कुटुंबियांना सर्व मुलभूत सुविधा पुरविण्याचे बंधनकारक असतांना केवळ प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईने या पुनर्वसित ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.परिसरात वाढलेल्या काटेरी झुडप्यांनी त्यांच्या रोजच्या जगण्याची वाट अवघड झाली होती.खुल्या जागेवर सांडपाण्याचे डबके निर्माण झाल्याने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते.पण एक कोटीची तरतूद केल्याने पुनर्वसित नागरिकांच्या जीवनात नवी पहाट उजाडली आहे..
सरपंच शशिकांत मंगळे यांच्या हस्ते नुकतेच या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
२०१३ मध्ये पुनर्वसन झाल्यावर २०१४ पर्यंत त्या सर्व पुनर्वसित नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची तरतूद अंदाजपत्रकामध्ये होती. १७ लाखांचे अंदाजपत्रक मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत तयार करण्यात आले होते .मात्र जिल्हाधिकारी कार्यालायासह विभागीय आयुक्त कार्यालयाच्या लालफितशाही मध्ये तरतूद असूनही अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पुनर्वसित कुटुंबियांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कसबेगव्हाण चे सरपंच शशिकांत मंगळे मागील वर्षापासून जिल्हाधिकारी ,विभागीय आयुक्त यांचे कडे सतत पाठपुरावा करत होते.या काळात त्यांनी अनेकदा प्रशासानाला पत्रे दिलीत . सुरुवातीला १७ लाखात ज्या मूलभूत सुविधा प्राप्त झाल्या असत्या त्याचा अनुशेष वाढतच गेला. २०२१ मध्ये आमदार बच्चु कडू राज्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या कामाला गती प्राप्त झाली.पण दप्तर दिरांगाईचा त्याला सुद्धा फटका बसला ..अखेर तीन वर्षानंतर आमदार बच्चु कडू यांच्या प्रयत्नानेच एक कोटीचा निधी पुनर्वसित नागरिकांना सोयी सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्राप्त झालेला आहे. त्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण , नाल्या व रपटे तसेच पोच मार्गाचे खडीकरण दुरुस्तीची कामे ही पार पडणार आहेत.पुनर्वसित ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला असून आमदार बच्चू कडू यांचे आभार व्यक्त केले आहेत..
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. अमोल घुरडे, उपाध्यक्ष किसान जिनिंग व संचालक जिल्हा सहकारी बोर्ड यांनी भूषविले व या प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री. प्रशांत दामले उपसरपंच, श्री सुधाकर शिंगणे, श्री वैभव झटाले, श्रीमती शागिराबी, सौ. विजयाताई ठाकरे, सौ. शरदाताई दामले, सौ. वृषाली चित्रकार, सौ रेखाताई हंबर्डे, सौ राधिका हिवराळे व श्री. विजय कथलकर ( ग्राम विकास अधिकारी) तसेच गावातली मान्यवर श्री. मनोहर टेकाडे, श्री. गजानन शिंगणे, श्री. रविंद्र चित्रकार, श्री. करीम भाई , श्री. सादिक भाई, श्री. शब्बीर शाह, व श्री रियाज भाई हे उपस्थीत होते.