मुलाने आईचा खून करून मृतदेह फेकला जंगलात
संशयीत आरोपी मुलाविरोधात दिघोरी मोठी पोलिसांत गुन्हा दाखल
भंडारा प्रतिनिधि / शमीम आकबानी
लाखांदूर | सकाळच्या सुमारास जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना एका अज्ञात महिलेचा सांगाडा आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून या घटनेची तपासचक्रे द्रुतगतीने फिरविली. तपासाअंती मुलाने आईचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जंगलात फेकल्याच्या तक्रारीवरून मुलाविरोधात दिघोरी मोठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रलेखा उर्फ रेखा अरुण वासनिक (४५) रा दिघोरी मोठी असे घटनेतील मृतक महिलेचे नाव असून संशयित आरोपी सुमित अरुण वासनिक (२५) रा दिघोरी मोठी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर ते साकोली राष्ट्रीय महामार्गावरील दांडेगाव जंगलात एका विवाहित महिलेचा सांगाडा आढळला होता. या घटनेची माहिती लाखांदूर दिघोरी मोठी व भंडारा पोलिसांना होताच भंडाराचे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, दिघोरी मोठी चे ठाणेदार अमर धंदर, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू, नंदेश्वर यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेच्या डोक्याची कवटी, हाताचे हाड, साडी, मंगळसूत्र व प्लास्टिक पोतडी यांसह अन्य साहित्य घटनास्थळावरून हस्तगत केले. मंगळसूत्र व साडी वरून हा सांगाडा महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. प्राथमिक अंदाजावरून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपासचक्रे मोठ्या द्रुतगतीने चालविली.
त्यानुसार परिसरात बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती गोळा करणे सुरू केले. त्यानुसार संशयित आरोपी म्हणून सुमित अरुण वासनिक याला ताब्यात घेतले. सुमित नेहमीच आपल्या आईसोबत भांडण करीत होता. ६ मे २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ च्या सुमारास सुमितने रोज रोजच्या भांडणाच्या कारणावरून आई चित्रलेखाला जीवानिशी मारले व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत प्लास्टिक पोत्यात भरून दांडेगाव जंगल परिसरात नेऊन फेकल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.
या घटनेत सीमा ज्ञानेश्वर मेश्राम (४०) रा दिघोरी मोठी यांच्या तक्रारीवरून व ठाणेदार यांच्या आदेशावरून दिघोरी मोठी पोलिसांत संशयित आरोपी सुमित विरोधात भांदविचे कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पवनीचे उप विभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.