या जमातीत लग्नानंतर मुल होण्याआधी पती बदलण्याची आहे मुभा
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल खूप चर्चा केली जाते; मात्र भारतात राजस्थानमध्ये खूप वर्षांपूर्वीपासून ही प्रथा एका वेगळ्या पद्धतीनं पाळली जाते. एका विशिष्ट जमातीचे लोक ही प्रथा पाळतात.त्यात महिलांना विशेष सन्मान दिला जातो.
लिव्ह इन रिलेशनशिप हे आधुनिक समाजात खूप प्रचलित झालं आहे. लग्न न करताही दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहून संसार करू शकतात ही लिव्ह इनची कन्सेप्ट खरं तर नवीनच आहे; मात्र भारतासारख्या विविध संस्कृतींचा मिलाफ असलेल्या देशात एका जमातीमध्ये ही प्रथा गेले अनेक पिढ्यांपासून पाळली जाते आहे. या जमातीच्या महिलांना जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य दिलं जातं.
शहरातल्या लिव्ह इनचं लोण आता ग्रामीण भागातही पसरतंय; मात्र त्याला समाजमान्यता नाही. त्यामुळे समाजात त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. राजस्थानातलं एक गाव मात्र ही लिव्ह इनची पद्धत अनेक वर्षांपासून पाळतं आहे. राजस्थानातल्या गरासिया जातीचे नागरिक लिव्ह इन पद्धतीनंच एकमेकांसोबत राहतात. खरं तर लग्नसंस्कारांना आपल्या समाजात खूप महत्त्व आहे; मात्र तरीही राजस्थानातल्या या जमातीनं स्वतःचं वैशिष्ट्य जपलं आहे.
या जामातीचे नागरिक लग्न एकाच अटीवर करतात. जेव्हा सोबत राहणाऱ्या महिलेला मूल होतं, तेव्हाच ते एकमेकांशी लग्न करतात. विशेष म्हणजे या समाजात महिलांना खूप सन्मान व प्रतिष्ठा आहे. मूल होण्याआधी महिला त्यांचा लिव्ह इन जोडीदार बदलूही शकतात. त्यांना ते स्वातंत्र्य दिलं जातं. पुरुषांपेक्षा जास्त महत्त्व महिलांना असतं. कोणासोबत राहायचं व कोणासोबत नाही, याचा निर्णय महिला घेऊ शकतात.
गरासिया जमातीच्या नागरिकांमध्ये दर वर्षी एक वधू-वर मेळावा आयोजित केला जातो. त्यात ज्याला जो जोडीदार पसंत पडेल, तो निवडून त्याच्यासोबत राहता येऊ शकतं. ते दोघंही वधू-वर एकमेकांसोबत लग्न न करता राहतात. ते जेव्हा परत येतात, तेव्हा मुलाचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबीयांना काही पैसे देतात. हा मेळावा दर वर्षी भरतो. त्यात मुली दर वर्षी त्यांचा जोडीदार बदलू शकतात. महिलेला मूल झालं, तरच त्या पुरुषाशी लग्न करू शकतात.
गरासिया जमातीच्या नागरिकांमध्ये ही प्रथा अनेक वर्षांपासून पाळली जाते आहे. त्या जमातीत जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य महिलांना असून, लग्न न करताही स्त्रिया व पुरुष एकत्र राहू शकतात. सध्याच्या लिव्ह इन पद्धतीप्रमाणेच ही पद्धत असली, तरी त्यात काही नियमांचं पालनही केलं जातं.