१० वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू

*वरूड/दिनेश मुळे
पुसला येथील बेल नदीच्या पात्रावर गावातील काही महिला गौरी विसर्जीत करण्यासाठी गेल्या असता त्यांच्या आईच्या शोधत गेलेल्या १० वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, पुसला येथील रंगारपेठ परिसरातील महिला गौरी पुजन करण्यासाठी बेल नदीवर गेल्या होत्या. तेव्हा हर्षल संतोष नगाटे (१०) हा त्याच्या आईला शोधण्यासाठी नदीकिनाऱ्यावर गेला होता. आई किनाऱ्यावर दिसत नसल्याने तो नदीपात्रातील पाण्यातुन दुसऱ्या किनाऱ्यावर जात असताना प्रवाहित पाण्यात वाहत गेला. त्याच्या आईने त्याला नदीवर येण्यास आधी मनाई केल्याचे माहिती दरम्यान समोर आले आहे. महिलांचे पुजन झाल्यावर घरी गेलेल्या हर्षल च्या आईला हर्षल घरी दिसला नाही, तो माझा मागे नदीवर आला असावा म्हणून त्याला परत नदीकडे शोधायला गेलेल्या आईला मुलगा दिसत नसल्याने तीने सर्वत्र आरडाओरडा सुरू केला. तेव्हा काही लोकांनी नदीपात्रावर जाऊन बघीतले असता हर्षल पाण्यात पुर्णतः गुदमरुन नदीकाठावरील गवतात पडुन असल्याचे लक्षात येताच त्याला बाहेर काढुन तत्काळ प्राथमिक उपचाराकरिता पुसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथुन त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मात्र त्याला मृत घोषित केले.