राजकिय

काल ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा आणी आज शिंदे ची खेळी 

Spread the love

ठाणे  / विशेष प्रतिनिधी

                  विधानसभा निवडणुका लक्षात घेता सगळ्याच पक्षांनी विजयासाठी कानावर कसली असून त्यांनी मेळावे आणि बैठका घेण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगाने उबाठा गटाचा मेळावा ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडला. या प्रसंगी ऊबाठा गट आणि मनसे सैनिका दरम्यान राडा झाला. मनसे सैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनावर नारळ फेकल्याने काही गाड्यांच्या काचा फुटल्या. मनसे सैनिकांनी गाड्यांवर शेन आणि बांगड्याही फेकल्या.

 आता हा मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोर का झटका दिला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिताताई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

एकनाथ शिंदेंकडून स्वागत

ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा संपताच अनिता बिर्जे यांनी आनंदआश्रमात येऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती.

ठाकरे गटाची ठाण्यात वाताहत

‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पुन्हा सत्तास्थापना केली, तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने ठाकरे गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत.

ठाकरे गट सोडण्यामागचे कारण

अनिता बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट सोडण्यामागचे कारण सांगितले. एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत. हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते मला पटलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे अनिता बिर्जे यांनी म्हटलं.

शिवसेनेला नवीन बळ मिळाले

अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. बिर्जेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल, अशी अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close