सामाजिक

स्वायत्त महाराष्ट्राची हाक – सह्यांची मोहीम

Spread the love

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

आपण भारत संघराज्यातील महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असून, महाराष्ट्र राज्याचे मालक आहोत. असे असूनही, आपल्याच घरामध्ये आपण आता दुर्लक्षित होऊ लागलो आहोत. प्रत्येक बाबतीत आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला दुय्यम स्थान दिले आहे. कारण रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या लोकांनी संख्या वाढताच स्थानिक राजकीय नेतृत्वांवर दबाव टाकत, त्यांनी स्वतःचे मतदारसंघ तयार केले. मुंबईत ८० नगरसेवक अमराठी असून, बाजूच्या मिरा रोड मध्ये ४७ आणि ठाण्यामध्ये २२ अमराठी नगरसेवक निवडून आले. तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये २६ अमराठी आमदार निवडून गेले आहेत.
राज्याच्या २०११ च्या जनगणनेनुसार पाहिले तर आता महाराष्ट्रामध्ये ४० टक्के अमराठी लोक राहत आहेत व अजून परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रावर आदळत आहेत. अशा परिस्थिती मध्ये, आपण आपल्या राज्यामध्ये अल्पसंख्यांक झालो तर आपल्या सर्व हक्क, अधिकारांसहित भाषा, संस्कृती, आपला गड, किल्ले, लेणी यासारखा ऐतिहासिक ठेवा, आपल्या रूढी परंपरा, संत साहित्य इत्यादी वर गंडांतर येणार आहे.
*आपण महाराष्ट्र भूमीचे मालक असूनही- आपणांस आपल्या राज्यात कोणी यावे, किती जणांनी यावे, हे ठरविण्याचे अधिकार नाहीत.* *आपल्या मराठी भाषेच्या राज्यात आपली भाषा सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करायचे अधिकार नाहीत.आपल्या मराठी भाषेतून शिकल्यावर रोजगार मिळण्यासाठी नोकऱ्या आरक्षित करू शकत नाही.आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे, कामगारांच्या हिताचे कायदे करू शकत नाही. स्थानिकांना फेरीवाला परवाना मिळावा यासाठी कायदा करू शकत नाही.
प्रत्येक ठिकाणी दिल्लीचा अंकुश आहे. आपण मालक असून ही, भाडेकरूचे जीवन जगतोय.
आता तर राज्यातील उद्योगच बंद झाले आहेत, तर काही दुसऱ्या राज्यात गेले आहेत व नवीन उद्योग येतच नाहीत. आताचा रोजगार हा विविध प्रकल्पात, जसे की रस्ते बांधणी, गृहनिर्माण, मेट्रो इथे कंत्राटी नोकऱ्यांमध्ये आहे. यामुळे कुटुंब व्यवस्थाच मोडीत निघाली आहे. घराच्या मालकाचा आर्थिक स्रोत बेभारवशाचा झाल्याने, कोणतेही नियोजन करणे दुरापास्त झाले आहे. याचे परिणाम मुलांचे शिक्षण, वृद्ध पालकांची जबाबदारी, आरोग्य सोयी इत्यादीवर झाले आहे.
या व अशा अनेक अडचणी परराज्यातील लोकांमुळे, मराठी भाषक समाजासमोर आ वासून उभ्या आहेत. जर पर राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांना रोखले नाही तर मराठा साम्राज्याच्या इतिहासावर वाईट परिणाम होणार आहेत.
“राज्य आमचे, तर कायदे नियम ही आमचेच असले पाहिजेत. जर असे होणार नसेल तर आमचे अस्तित्व, आमच्या घरातून नष्ट होणार आहे. हा धोका ओळखून, महाराष्ट्राच्या भवितव्याचा वेध घेत, काही मराठी तरुणांनी एकत्र येऊन “स्वायत्त महाराष्ट्राची हाक दिली आहे. ज्यात स्थलांतर प्रतिबंध, व्हिसा पद्धत आणि १९६० च्या महाराष्ट्र राज्यनिर्मितीपासूनचे अधिवास धोरण अश्या विविध मागण्यांचा समावेश आहे.
मराठी लोकांमध्ये जनप्रबोधन करून जनजागृती करण्यासाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियान सुरू केले आहे.
शनिवार दिनांक १० ऑगष्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता भांडुप पश्चिम येथे सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली होती , या प्रकारच्या सह्यांच्या मोहिमा विविध विभागांमध्ये राबवून मराठीजनांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष वेधणार आहेत. तमाम मराठी भाषिक समाजातील लोकांनी या मोहिमांमध्ये सामील व्हावे, असे आवाहन कोअर समिती सदस्य ॲड. श्री.सुनील साळुंखे, श्री.प्रमोद मसुरकर, श्री.मनोज सावंत, श्री. प्रमोद सावंत, ॲड. श्री.श्रीकांत शिंदे, श्री.तनेश सोमवंश, श्री. सुमित पाटील, श्री.संतोष आरेकर, श्री.नारायण मिरजोळकर, श्री.मयूर गुंजाळ, श्री.नारायण आळवे, ॲड. बालुशा माने, ॲड. भक्ती भाटे,श्री. मिलिंद कांबळी, श्री.मारुती गवलवाड,श्री. रवींद्र देसले, श्री.राजेश मुलुख, श्री.सचिन सुर्वे यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close