आत्महत्येच्या उद्देशाने त्याने खाईत उडी मारली पण तीन दिवसांनी जिवंत सापडला
मुंबई / विशेष प्रतिनिधी
आयुष्याचा शेवट करण्यासाठी त्यानें खाडीत उडी मारली. पण त्याला मरण आले नाही. शेवटी त्याने ७२ तास समुद्राच्या खाऱ्या पाण्यात काढले. मरण यावे यासाठी तो पोहून खोल पाण्यात देखील गेला. पण कदाचित यमराज सुटीवर असावेत म्हणून त्याला मरण आले नसावे.
शेवटी तो खाडीतील तिवरांच्या झाडा झुडपात आला. तिथं बेपत्ता असल्यानं त्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांना तो दिसला आणि त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तीन दिवस तो समुद्राच्या खाऱ्या पाण्यात होता. अन्न-पाण्याविना तो खाडीच्या पाण्यात राहिला आणि सुखरूप बाहेर आल्यानं आता त्याची चर्चा होत आहे.
ऐरोली पुलावरून तरुणाने आत्महत्या करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी उडी मारली होती. समुद्राला भरती असतानाही तो त्या पाण्यात पोहोचला. खाडीत कित्येक किलोमीटर चालला. मासे, साप, विंचू आणि इतर घाण असलेल्या पाण्यात तो 72 तासांपेक्षा अधिक काळ होता. खाडीत उडी मारल्यानंतर तो खोल पाण्यात जाण्यासाठी काही वेळ पोहोला, त्यानंतर मात्र पुन्हा बाहेर आला आणि खाडीतील झाडांमध्ये अडकून पडला.
दरम्यान, खाडीत उडी मारलेला तरुण जिवंत नसेल असं वाटून पोलीस त्याचा शोध घेत होते. मृतदेह सापडेल यासाठी पोलीसांकडून बोटीने तिवरांच्या झाडा झुडपात त्याचा शोघ घेतला जात होता. त्यावेळीच अचानक पोलिसांना तिवरांच्या झाडांतून एक तरुण चालत येताना दिसला. पोलिसांनी त्याला तात्काळ बोटीत घेतलं. तिथून त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याची प्रकृती ठीक असून चेकअपनंतर त्याला घरी सोडण्यात आलं आहे.