आयएमए अकोला तर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स दिन सोत्साहात संपन्न
अकोला / प्रतिनिधी
कोविड च्या जागतिक महामारीच्या अत्यंत कठीण समयी जगभरातील डॉक्टरांनी आपले प्राण पणाला लावुन प्रसंगी प्राणांची आहुती देऊन संकटमोचक म्हणून भुमिका बजावली.
अश्याच संकटमोचकांपैकी एक होते डॉ. बिधानचंद्र रॉय.
दरवर्षी एक जुलै रोजी त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ भारतात सर्वदुर राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केल्या जातो.
इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन सोसायटी फॉर क्रिटिकल केअर मेडिसिन अकोला यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या पुर्वसंध्येला “हमें जिन पर नाज है” हा कार्यक्रम अतिशय थाटामाटात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रमिलाताई ओक हॉल येथे साजरा केल्या.
या कार्यक्रमासाठी डॉ. हिम्मतराव बावस्कर कोकणातील महाड येथून तर नागपुरहून डॉ. विकास महात्मे आणि डॉ. चंद्रशेखर मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून आले होते. ह्या तिघांनाही भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री उपाधीने गौरविले आहे. अकोला नगरीमधे एकाच मंचावर तिन पद्मश्री उपाधीने सन्मानित डॉक्टर्स राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त उपस्थित असण्याचा कपिलाषष्ठीचा योग प्रथमच जुळून आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अकोला नगरीचे भुषण वैद्यकीय क्षेत्रातील भिष्मपितामह डॉ. नानासाहेब चौधरी ह्यांनी भुषविले.
आयएमए अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सोनोने यांनी आपल्या प्रस्तावनेत डॉक्टर आणि समाज यांच्यातील समन्वय साधण्यासाठी “हमे जिन पर नाज है” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नमुद केले. विदर्भातून पद्मश्री उपाधीने सन्मानित असलेल्या या डॉक्टरांबद्दल आम्हाला अभिमान असून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आम्हाला धन्यता आहे असे पण त्यांनी नमूद केले.
या तीनही प्रमुख अतिथींचा प्रथम नागरी सत्कार करण्यात आला. तत्पश्चात त्यांनी वेगवेगळे विषयांवरती उपस्थितांना आरोग्य विषयीचे मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम जे नागपूर येथे मेंदू रोग तज्ञ म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांनी आहार आणि मेंदूचे आरोग्य यासंबंधी सखोल माहिती दिली. आजची पिढी आहारावर नियंत्रण न ठेवल्यामुळे कशी विविध आजारांना बळी पडत आहे यासंबंधी अतिशय धक्कादायक अशी माहिती त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात दिली. निव्वळ आहारावर नियंत्रण आणि सुयोग्य आहार हीच निरोगी आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे हे त्यांनी ठासून सांगितले.
त्यानंतर नागपूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. विकास महात्मे यांनी नजरेआड ची सृष्टी कशी आम्हाला कळत नकळत रोगी बनविते आणि आम्ही त्या बदललेल्या जीवनशैलीमुळे कसे निरंतर विविध आजारांनी ग्रस्त होतो यासंबंधी ऊहापोह केला. सुखी जीवनाचा मुलमंत्र आत्मसात करण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेण्याची आता आवश्यकता आहे हे ठासुन सांगताना एम्स नागपूर येथे अश्या प्रकारचा कोर्स सुध्दा त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सर्वात शेवटी डॉ. हिम्मतराव बावसकर यांनी संशोधनामुळे रूग्णसेवेत होणारे फायदे सांगताना पश्चिम विदर्भातील खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये किडनीच्या आजाराचे मुळ कारण रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे कॅडमियम आणि शिसे ह्या विषारी धांतुंचे व्यस्त प्रमाण आहे असे आपल्या संशोधनातुन सिध्द झाल्याचे सांगितले. भुपृष्ठावरील पाण्याचा दैनंदिन जीवनात अधिक वापर करून कुपनलिकेतील पाण्याचा वापर टाळल्यास किडनीच्या आजाराचे प्रमाण नगण्य राहते हे ही त्यांनी प्रतिबंधात्माक उपाय योजना करताना सांगितले.
सरतेशेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब चौधरी यांनी स्वतः च्या अनुभवातून आहार हाच निरोगी राहण्याचा कळीचा मुद्दा असल्याचे सांगुन संतुलित आणि निरोगी आहाराचेच सेवन करावे असे ठासुन सांगितले. आयएमए आणि आयएससीसीएम अकोलाचे त्यांनी हमें जिनपर नाज है या वेगळ्या धाटणीच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तोंडभरून कौतुकही केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुमेधा हर्षे, डॉ. नम्रता भागवत यांनी अतिशय सुत्रबध्द आणि मेधावी भाषेत करून उपस्थितांची मने जिंकली. सरतेशेवटी सचिव डॉ. सागर भुईभार, यांनी आभारप्रदर्शन केले.
ह्या कार्यक्रमासाठी विशेषकरून डॉ. गजानन नारे, डॉ. विरवाणी, डॉ. विनायक देशमुख, डॉ. बसंत बागडी, डॉ. हाते, डॉ. विजय खेरडे, डॉ. एस.एस. काळे, मनोहर हरणेमामा, अशोक ढेरे, डॉ. संदिप चव्हाण, डॉ. सुनिल बिहाडे इत्यादी प्रभृती उपस्थित होत्या.