पत्नीचे कार्यालयातून अपहरण करून भुलीचे इंजेक्शन देत 2 दिवस कार मध्ये डांबून ठेवले
पुणे / नवप्रहार डेस्क
ज्या दिवशी पत्नी आपल्याला सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी उपवास ठेवत असते त्याच दिवशी पती कडून पत्नीचे अपहरण करत तिला भुलीचे इंजेक्शन देत दोन दिवस कार मध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महिलेने तरुणाच्या माध्यमातून पोलिसांशी कसाबसा संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
पुण्याच्या मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. मात्र आठवडाभरात पतीने वेगवेगळ्या मागण्या सुरु केल्या. या मागण्या न पटल्याने तिने सुमितपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तिने थेट मुंबई गाठली, यानतर काही महिने मैत्रिणीकडे राहिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आली होती. एका बांधकाम व्यवसायिकाकडे ती काम करत होती. याचा सुगावा सुमितला लागला अन त्यानं पत्नीच्या ऑफिसचा पत्ता काढला.
19 जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये पोहोचला होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास त्याने पत्नीला फरफटत आणून गाडीत बसवलं. त्यावेळी पत्नीचा मित्रही जबरदस्तीने गाडीत बसला. गाडी मंचरच्या दिशेने निघाली होती. थोडं पुढं गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावली आणि गाडीतून बाहेर ढकलून दिलं. प्रवासादरम्यान सुमितने पत्नीला भुलीचं इंजेक्शन दिलं. यानंतर गाडीतच डांबून ठेवलं. शुद्धीवर आल्यावर वारंवार भुलीच इंजेक्शन दिलं जात होतं असा आरोप पत्नीने केला आहे.
20 जूनच्या दुपारी पत्नीने सुमितला विश्वासात घेतलं. सांगशील त्या कागदपत्रांवर सही करते, असं तिने सांगितलं. यानंतर सुमितने गाडी मंचर परिसरात आणली. मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही. असा बहाणा पत्नीने केला. यानंतर ते एका मंदिरात थांबले. पत्नीने संधी साधत एका तरुणाला खुणवत मदतीची मागणी केली. तरुणाला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने मंचर पोलिसांना कळवलं.
पोलीस मंदिरात पोहचले अन पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली. महिलेने पोलिसांवर सगळा घटनाक्रम सांगितला. तिने पती, आई आणि चालकावर अनेक आरोप केले आहेत. आज सकाळी पत्नीने वाकड पोलीस स्टेशन गाठलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपहरण ते सुटका या दरम्यान बेशुद्ध असताना नेमकं काय-काय घडलं, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.