बोगस बियाणांचा शिरकाव रोखण्यासाठी कृषिमंत्र्यांना ‘गुरुदेव’चे साकडे
शेतकऱ्यांना बोगस बियाणे ओळखण्याचे दिले जावे प्रशिक्षण
यवतमाळ : विक्रीस बंदी असलेले बोगस बियाणे यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे.शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा उचलून त्यांना ही बियाणे विकली जात आहे.हा गोरखधंदा तेजीत सुरू असून यावर कृषी विभागाने आळा घालावा,अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी राज्याचे कृषिमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे.यासाठी गेडाम यांनी थेट त्यांची मुंबई स्थित कार्यालयात भेट घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वास्तविकता मांडली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी गुरुदेव युवा संघ नेहमी पुढे असते.जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मांडले.यातील काहींना यश आले तर काही अजूनही प्रलंबित आहे.सध्या खरिपाची तयारी शेतकऱ्यांकडून केली जात असून जिल्ह्यातील शेतकऱ्याने मशागतीला सुरुवात केली आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणावर शेतकऱ्यांनी बियाणे लागवडीचे नियोजन केले आहे.परंतु,जिल्ह्यातील नेर,राळेगाव,बाभुळगाव तसेच मारेगाव तालुक्यात बोगस बियाणे दाखल झाल्याचे पुढे आले असून यातील दोषींवर कारवाई झाली आहे. आजघडीला शेतकरी पूर्णतः खचला असून त्याच्या माथी बोगस बियाणे मारले जात असल्याने हा गैरप्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून अपेक्षित काम होत नसल्याचा आरोप गेडाम यांनी केला आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे बोगस बियाणे दाखल झाले असून हा काळाबाजार रोखण्यासाठी गेडाम यांनी थेट कृषी मंत्री यांची मुंबई स्थित कार्यालयात जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांना घडवण्याचा प्रकार रोखला जावा बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी, बोगस बियाण्यांचा ज्या ठिकाणी साठा होतो अशा ठिकाणांचा शोध घेतला जावा सोबतच शेतकऱ्यांना बोगस बियाणे कसे ओळखावे याबाबत मार्गदर्शन केले जावे अशी मागणी गेडाम यांनी आपल्या निवेदनातून कृषिमंत्र्यांकडे केली यावेळी गुरुदेव युवा संघाचे शाखा उपाध्यक्ष भाऊराव वासनिक, जगन, नेवला,रितेश चौधरी बाबू बिसलरी, नकेता आदी उपस्थित होते.
बोगस बियाणांचा रॅकेट चालविणारे कोण?
राज्यात विक्रीस बंदी असलेले कापूस बियाणे आणून विक्री केले जात आहे.नेर,राळेगाव,बाभुळगाव तसेच मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे छापा टाकत सव्वा लाखाचे बियाणे जप्त केले. कृषी विभागाचे पथक धडकताच बियाण्यांची विक्री करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणातून जिल्ह्यात बोगस बियाणांचा शिरकाव झाल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
मारेगाव तालुक्यात काही व्यक्ती तेलंगणा, गुजरात राज्यातून बोगस बियाणे आणून तालुक्यात विकत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. या प्रतिबंधित बियाणांची खोटी जाहिरात करून शेतकऱ्यांच्या माथी हे बियाणे मारले जात आहे.तेव्हा हा गैरप्रकार रोखण्यासाठी कृषी मंत्र्यांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करावे,अशी मागणी गेडाम यांनी केली आहे.बोगस बियाणांचा रॅकेट चालविणारे कोण? असा प्रश्न देखील गेडाम यांनी उपस्थित केला आहे.