सेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीला अपत्यप्रेम कारणीभूत – पाटील
राज्यातील।महाविकास आघाडी सरकार शिंदे यांच्या बंडामुळे कोसळले. त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मधुन बाहेर पडत आपला वेगळा गट स्थापत राज्य सरकारला पाठिंबा दिला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपा वर पक्ष फोडण्याचा आरोप करीत आहेत. तर हे दोन्ही पक्ष फुटण्यासाठी अपत्य प्रेम कारणीभूत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.
रश्मी ठाकरे यांना आदित्य ठाकरेना मुख्यमंत्री करण्याची इच्छा होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचे नाव समोर आले. पण पुढचे अडीच वर्षांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा गुप्त समझोता झाला होता. या गुपित गोष्टी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समजल्यानंतरच दोन्ही पक्षात फूट पडली, असा दावा उमेश पाटील यांनी केला आहे.
उमेश पाटील पुढे म्हणाले, अजित पवार हे तीन वेळा आमदार तर एकदा खासदार झालेत. आर. आर. पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, यांच्यासारखे जेष्ठ नेते देखील मुख्यमंत्री करण्यासारखे होते. तेही मुख्यमंत्री पदाला सक्षम होते. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांना ग्रामपंचायत सदस्य पदाचाही अनुभव नसलेले ते ठाकरे मुख्यमंत्रीपदी कसे चालले, असा सवाल पाटील यांनी केला. .
महाविकास आघाडीच्या पुढच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव आखण्यात आला होता. त्याची माहिती आणि भनक सुद्धा काँग्रेसला नव्हती. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराला याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळेच पक्ष फुटण्याचे हे महत्त्वाचं कारण आहे, असा दावा पाटील यांनी केला.
उमेश पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील आरोप केलेत. खासदार राऊत हे माध्यमांना खोटी माहिती देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास कोणाचाही विरोध नव्हता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी पुत्र प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा घाट लावून धरला होता, असा आरोप उमेश पाटील यांनी केला.