लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे
मुंबई- (विशेष प्रतिनिधी ) मुंबईतील लोकसभा मतदारसंघात उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांनी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करावे, असे जाहीर आवाहन मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. तसेच मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पारितोषिकही देण्यात येणार असल्याचे प्रकाश दरेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई हौसिंग फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दरेकर यांनी म्हटले आहे की, आपल्या संस्थेतील सर्व सभासदांना लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उपकृत करावे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, संचालकांनी संस्थेच्या सभासदांना मतदान प्रक्रियेत शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. आवश्यक ते सर्व जनजागृतीपर उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करावा. मतदान कोणाला, कोणत्या पक्षाला करतील याच्याशी आपला संबंध नाही. गृहनिर्माण संस्थांतील सर्व सभासदांची नावे मतदार यादीत आहेत की नाही याची खात्री करावी. मतदार यादीत नाव तपासणीसाठी voter help line app डाउनलोड करा किंवा electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करा. तसेच मतदार मदत क्रमांक १९५०/०२२-२०८२२६९३ या हेल्पलाईन क्रमांकावर संवाद साधून या माध्यमातून मतदार यादीतील नावाची खात्री करू शकतात. याबाबत आपल्या संस्थेतील सभासदांनी माहिती देणे, वोटर गाईड व वोटर स्लिप घरोघरी पोहोचेल याची खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घेऊन मतदारांना मतदानासाठी प्रेरित केल्यामुळे जास्त मतदान झाले आहे अशा प्रत्येक विभागातील किमान १० गृहनिर्माण संस्थांना सहकार विभागातर्फे प्रशस्तीपत्रक किंवा पारितोषिक देण्यात येणार आहे. लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात शंभर टक्के मतदान करून प्रत्येक सभासदाने व त्याच्या कुटुंबियांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहनही प्रकाश दरेकर यांनी केले आहे.