धाड.. धाड.. धाड…आणि गँगस्टर चा गेम ओव्हर
इंदापूर, पुणे / नवप्रहार मीडिया
मागील काही काळापासून क्राईम शहर म्हणून प्रसिद्धीस येत असलेल्या पुणे शहरात प्रत्येक दिवसाला खून , बलात्कार , किडनॅपिंग सारखे गुन्हे घडत असतात.अश्यातच शहराच्या बाह्य वळणावर असलेल्या हॉटेल जगदंबा मध्ये जेवणासाठी आलेल्या चौघांपैकी एकावर गोळीबार करत त्याचा खून केला आहे. अविनाश बाळू धनवे (रा. आळंदी) असे त्याचे नाव असुन तो गँगस्टर असल्याचे उघड झाले आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर ते जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. परंतु पुढे काय घडणार आहे, त्याची चौघांना कल्पना नव्हती. हे चौघे जण जेवणासाठी बसलेले असताना दोन युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी थैलीत आणलेली पिस्तूल काढले आणि चौघांपैकी अविनाशवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर आणखी काही युवक आले. त्यांनी अविनाशवर कोयत्याने वार सुरु केले. त्यानंतर काही सेंकदात सर्व जण हत्या करुन फरार झाले. यावेळी अविनाशसोबत असणारे तिघे प्रचंड घाबरले. त्यांनी पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
शनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान या हल्लाची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान अविनाश धनवे हा गुन्हेगार आहे. यामुळे गुन्हेगारी वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे.
अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गॅंगचा म्होरक्या होता. गेली पंधरा वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत हाणामारी झाली होती.