भारतीय राज्यघटनेची मूल्ये पायदळी तुडवून मनुस्मृती आणण्याचा डाव ओळखा.–श्याम मानव

आर्णी येथील व्याख्यानात मोदी सरकारवर घणाघाती हल्ला
आर्णी –
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. गांधी, नेहरू,आंबेडकर यांच्या समन्वयातून निर्माण झालेली ही राज्य घटना इथल्या शोषित माणसांचे कवचकुंडल आहे.मात्र राजकीय सत्तेच्या बळावर भारतीय राज्यघटनेने दिलेली स्वातंत्र्य, समता,बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये पायदळी तुडवून पुन्हा मनुस्मृती आणू पाहणारी एक यंत्रणा अस्तित्वात येत आहे.हे क्रूर मनसुबे उधळून लावण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. हिंदू खतरे मे है ची भ्रममूलक ओरड करून बहुतांश हिंदुना मुस्लिम विरोधात उभे करून राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान सुरू आहे.हे कारस्थान वेळीच ओळखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संघटक प्रा.श्याम मानव यांनी केले.
आर्णी येथे भारतीय लोकशाही विचार मंच आर्णी चे वतीने आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभाताई धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, माजी आ. ख्वाजा बेग, युवा नेते जितेंद्र मोघे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग, संतोष अरसोड, सुनील भारती, प्रदीप वानखडे, नालंदा भरणे, संगीता किशोर रावते, सुनंदा बोक्से उपस्थित होते. आर्णी तालुक्यातील हजारो सुजाण नागरिकांच्या उपस्थितीत तब्बल दोन तास मानव यांनी मोदी सरकारची चिरफाड केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हरीश कुडे, प्रास्ताविक सुनील सुखदेवे तर आभार प्रदर्शन तुळशीदास मोरकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता गफ्फार शेख, सुनील सुखदेवे, तुळशीदास मोरकर, अजाबराव बुटले, दिलीप मनवर, महेश बुटले, शेरु सर, प्रकाश कुडे, प्रमोद कुदळे, गिरीधर कुबडे, विजय ढाले, महादेव लंबे, देवानंद भगत यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.