आध्यात्मिक

भगवान खंडेश्वराचे साडेसातशे वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवालय

Spread the love

 

हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात

नांदगाव खंडेश्वर/पवन ठाकरे

नांदगाव खंडेश्वर येथील श्री.खंडेश्वराचे प्राचीन शिवालय हे हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमूना तर आहेच पण संतांच्या तपश्चयनि पुनित झालेली मनशांती देणारी ही पावन भूमी आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधत दूरवरचे भाविक येथे दर्शनास येत असतात.श्री भगवान खंडेश्वराचे हे पुरातन देवालय रामदेवराच्या कारकिर्दीमधील आहे. शके ११७७ आनंद संवत्सरी म्हणजे इ.सन १२५४-५५ मध्ये म्हणजे अंदाजे ७५० वर्षापूर्वी बांधण्यात आलेले आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्प कलेचा उत्कृष्ट कलाकृती या शिवमंदिराच्या दगडी भिंतीवर कोरलेल्या आहेत. प्रमुख शिवालयाच्या पूर्वेकडील दर्शनी दरवाजावर कोरलेले शिल्पकाम प्राचीन शिल्पकारांच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष देत आहे. रामदेवरायाचा प्रधान हेमाद्रीपंत यांनी हे पुरातन शिवालय बांधल्याची नोंद मंदिरावर देवनागरी लिपीत लिहिलेल्या
शिलालेखात आहे. दगडी रेखीव चिन्यांनी बांधलेल्या या शिवालयात विशिष्ट पध्दतीने तयार केलेल्या विटांची जोडणी आहे. या वीटा आजही पाण्यावर तरंगतात असे सांगितले जाते.
मुख्य शिवालयात प्राचीन शिवालिंगाची स्थापना केली आहे. दुसरे मंदिर शिव पार्वतीचे आहे व ते उत्तरेकडे आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील देवळात नृसिंहा मूर्ती, हिरण्य कश्यपला मांडीवर घेऊन आपल्या तिक्ष्ण नखांनी त्यांचे पोट फाडताना दिसत आहे. या तिनही देवळांना जोडणारा गाभारा मात्र एकच असून ते प्रवेशद्वार आहे. शिवमंदिराच्या या गाभाऱ्यात मध्यभागी शिवाचे वाहन नंदी आहे. देवाच्या सभोवताली पक्क्या बांधणीचा दगडी परकोट आहे. देवालयाचे महाद्वार दक्षिणेकडे असून त्यासमोर अष्टभुजा देवीचे मंदिर आहे.पूर्वेकडे उंच अशी दीपमाळ असून त्यासमोर वदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.

“””””””””””””””””””””””””””””””””””””
*श्री खंडेश्वर भगवानचे ऐतिहासिक महत्व*
ऐतिहासिक दृष्ट्या या प्राचीन देवालयाचे विशेष महत्व आहे. कौंडिण्य मुनिच्या शिष्यात ६ खंड्या नावाचा शिष्य अत्यंत लाडका होता. याच खंड्याने स्थापन केलेला महादेव म्हणजेच खंडेश्वर भगवान होय. याच खंडेश्वर भगवानच्या कृपेने नांदणारे गाव म्हणजेच नांदगाव खंडेश्वर होय. श्रावण सोमवार, प्रदोष किंवा महाशिवरात्रीला परिसरातील खंडेश्वर बोंडेश्वर व कोंडेश्वर या तीन शिव तिर्थाची पदयात्रा करणाऱ्यास काशी यात्रेचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रध्दा आहे. मंदिराच्या परिसरातील टेकडीवर. संस्थानतर्फे वड, पिंपळ,बेल, कडुलिंब इत्यादी हिरव्या कंच वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामुळे शिवतीर्थला प्रसन्नता लाभली आहे. उत्तरेकडील महाद्वारासमोर दीपमाळी व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असून देवीचे मंदिर आहे. गुरुदेव प्रार्थना मंदिरही बांधण्यात आले आहे. शिवरात्री महोत्सवात आस्थेने व श्रद्धेने श्रीखंडेश्वर मंदिरात भाविक हजारोच्या संख्येने दर्शनाकरिता येतात.
“”””””””””””””””””””””””””””””””””””
*शिवालयातील चाबीचे आकर्षण*
नांदगाव खंडेश्वर येथील शिवालयाच्या विविध वैशिष्ट्यांपैकी एक येथील शिवालयाच्या बांधकामामध्ये दगडांच्या आड एक चाबी असल्याचे सांगितल्या जाते.ही चाबी काढली तर मंदिर कोसळेल, अशी आख्यायिका आहे.त्यामुळे या चाबीचीदेखील भाविक पूजा करतात.या चाबीला हात लावला तर ती हलते; मात्र ती त्या दगडांमधून निघत नाही. या शिवालयाची पाहणी करण्यासाठी काही वैज्ञानिक येथे आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार या शिवालयावर वीज पडू नये, यासाठी केलेली खास व्यवस्था म्हणजे ही चाबी असल्याचे त्यांनी सांगितले होते. या शिवालयाच्या कळसावर कावळा, कबूतर बसत नाहीत, असे सुद्धा म्हटले जाते; परंतु या कळसावर केवळ रान पोपटांचा थवा नियमित असतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close