अल्पवयीन मुलींकडून देहव्यवसाय करून घेणाऱ्या पिता पुत्राला अटक

नागपूर / विशेष प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीकडून ‘ओयो’ हॉटेलमध्ये देहव्यापार करवून घेणाऱ्या बापलेकासह पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनीष नगरात असलेल्या हॉटेलवर गुन्हेशाखा युनिट ४ च्या पथकाने धाड घालून मुलीची सुटका करीत तिघांना ताब्यात घेतले. हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (५५) आणि आशिष चावला (२७) रा. छत्रपती चौक अशी आरोपी बापलेकाची नावे आहे
मनीष नगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील ओयो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती होती. हॉटेल मालक राकेश व आशिष चावला यांनी काही अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलविण्याच्या कामासाठी व्यवस्थापक धीरज खुळे(रा. राकेश लेआऊट बेलतरोडी), गजानन सोनवणे (४० रा. अमर संजय सोसायटी, मनीषनगर) आणि अलोक रैकवार (३४ रा. रमानगर, अजनी) या तिघांना कामावर ठेवले होते.
तिघांनी ८ ते १० तरुणी आणि अल्पवयीन मुलींना ओयोमध्ये ठेवले होते. तेथे मुलींचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करण्यात येत होते. एसएसबी पथक देहव्यापाराच्या अड्ड्यांवर कारवाई करीत नसल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक श्याम सोनटक्के, सहायक निरीक्षक अयुब संदे, अविनाश जायभाये यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा घातला. यावेळी १५ वर्षाच्या मुलीला ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.